VIDEO: राज्य सोडा, नाही तर जमिनीत १० फूट खाली गाडेन; मुख्यमंत्री चौहान भडकले
By कुणाल गवाणकर | Published: December 26, 2020 08:41 AM2020-12-26T08:41:42+5:302020-12-26T08:45:40+5:30
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रमात माफियांना थेट इशारा
भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माफियांना थेट इशारा दिला आहे. माफियांनी राज्य सोडून निघून जावं, अन्यथा त्यांना जमिनीत १० फूट खाली गाडू, अशा शब्दांत चौहान यांनी माफियांना इशारा दिला. सुशासन दिनानिमित्त होशंगाबाद जिल्ह्यातल्या बाबई विकासखंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चौहान माफिया आणि त्यांच्या कारवायांबद्दल संतापलेले दिसले.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माफियांना थेट राज्य सोडून जाण्याचा सल्ला दिला. राज्य सोडा, अन्यथा परिणाम भोगा, असा इशाराच चौहान यांनी दिला. 'आज काल मी अतिशय खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही. मामा फॉर्ममध्ये आहे. माफियांविरुद्ध अभियान सुरू आहे. माफिया त्यांचा प्रभाव वापरून कुठे कुठे अवैधपणे कब्जा करत आहेत. काही ठिकाणी ड्रग माफिया सक्रिय आहेत. माफियांनो ऐका, मध्य प्रदेश सोडा, अन्यथा जमिनीत १० फूट खाली गाडेन. कुठेही कळणार नाही,' असा इशारा चौहान यांनी माफियांना दिला.
"I am in a dangerous mood nowadays. I will not spare those who are involved in illegal activities. Leave, Madhya Pradesh, otherwise, I will bury you 10 feet deep and no one will know about your whereabouts," Madhya Pradesh CM SS Chouhan at an event in Hoshangabad Dist. yesterday pic.twitter.com/YvQ7SyHGdy
— ANI (@ANI) December 26, 2020
मध्य प्रदेशात केवळ सुशासन चालेल, असं चौहान यांनी म्हटलं. 'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची जयंती आपण सुशासन दिवस म्हणून साजरी करतो. जनतेला कोणत्याही अडचणींविना सरकारी सेवा आणि योजनांचा लाभ मिळावा हाच आमच्यासाठी सुशासनाचा अर्थ आहे. इथे फन्ने खां चालणार नाही. इथे केवळ सुशासन चालेल,' असं चौहान म्हणाले.