आगामी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार; मायावती यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 01:55 PM2023-07-19T13:55:16+5:302023-07-19T13:55:39+5:30
एनडीए आणि इंडिया यांची देशातील सर्व पक्षांसोबत जुळवाजुळव सुरु असताना बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ठोस आव्हान देण्याच्या प्रयत्नात २६ विरोधी पक्षांनी मंगळवारी त्यांच्या आघाडीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस’ (इंडिया) असे ठेवले. देशासमोर पर्यायी राजकीय, सामाजिक व आर्थिक अजेंडा मांडण्याचा संकल्प विरोधकांची बैठकीत व्यक्त केला. दोन दिवसीय बैठकीत विरोधी पक्षांनी युतीमध्ये एक समन्वयक आणि ११ सदस्यांची समन्वय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.
एनडीए आणि इंडिया यांची देशातील सर्व पक्षांसोबत जुळवाजुळव सुरु असताना बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे. आगामी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय मायावती यांनी घेतला आहे. मायावती यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, विरोधी पक्ष सत्ता मिळविण्यासाठी युती करत आहेत. काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, काँग्रेस आपल्यासारख्या जातीयवादी आणि भांडवलशाही शक्तींशी युती करत आहे. काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडल्यावरच दलित, मागासलेल्या, गरीबांची आठवण येते. सत्तेत असताना भाजपा आणि काँग्रेसला कोणाचीही पर्वा नाही. २०१४मध्ये भाजपाने प्रत्येक गरीबाच्या खात्यात १५-१५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण झाले नाही, अशी टीका मायावती यांनी केली.
राहुल गांधी यांनी सुचवले ‘इंडिया’ नाव
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवावे, असे सुचवले. सर्वसंमतीने याला पाठिंबा देण्यात आला. सर्वप्रथम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधींच्या सूचनेची प्रशंसा करताना म्हटले की, यापेक्षा अधिक चांगले नाव असूच शकत नाही. आघाडीचे नाव इंडिया असे सुचवताना राहुल गांधी बैठकीत म्हणाले की, ही आघाडी देशासोबत आहे. आपली लढाई कुणासाठी आहे? आक्रमण कोणावर होत आहे? हल्ला कोणावर होत आहे? देशाचे संविधान, लोक, संस्था, स्वातंत्र्य व लोकशाहीवर हल्ला होत आहे. ही लढाई ‘इंडिया’ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे.
विरोधकांची पुढील बैठक होणार मुंबईत
विरोधी आघाडीचा चेहरा कोण असेल, यासंदर्भात पत्रपरिषदेत मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या पुढील बैठकीत आघाडीचे निमंत्रक आणि समन्वय समितीचे सदस्य निश्चित केले जातील. सर्व नेते आणि समन्वय समितीच्या सदस्यांमध्ये जागावाटपावर चर्चा केली जाईल. विरोधी ऐक्यासंदर्भात होणारी तिसरी बैठक मुंबईत घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली नसली तरी ती संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर म्हणजे १५ ऑगस्टनंतर होण्याची शक्यता आहे.