धीरज साहूंचे पैसे परत मिळणार?; जप्त केलेल्या ३५१ कोटींचे IT विभाग काय करणार...जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:39 AM2023-12-12T10:39:05+5:302023-12-12T10:45:57+5:30
आयकर विभागाच्या (आयटी विभाग) पथकाने धीरज साहू यांच्याशी संबंधित असलेल्या जागेवर ६ डिसेंबर रोजी एकाच वेळी छापे टाकले होते.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद यांच्या घरातून आयकर विभागाने ३५१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. घराच्या कानाकोपऱ्यात ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांची इतकी बंडल सापडली की आयकर विभागालाही धक्का बसला. नोटा मोजण्यासाठी यंत्रे आणली, पण तीही अडचणीत आली. नंतर पैस मोजण्यासाठी आणखी काही मशिन आणि अधिकारी समाविष्ट करावे लागले.
आयकर विभागाच्या (आयटी विभाग) पथकाने धीरज साहू यांच्याशी संबंधित असलेल्या जागेवर ६ डिसेंबर रोजी एकाच वेळी छापे टाकले होते. त्याच्या घरावर पाच दिवस शोधमोहीम राबवून बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली. साहूच्या लपलेल्या ठिकाणांवरून ३५१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने एकूण १७६ बॅगांपैकी १४० बॅगांची मोजणी पूर्ण केली. आतापर्यंत पकडलेला हा सर्वात मोठा काळा पैसा असल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे.
या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले
आयकर विभागाची ही कारवाई मद्यविक्रीशी संबंधित व्यवसायात करचोरी होत असल्याच्या आशंकामुळे सुरू करण्यात आली होती. करचुकवेगिरीच्या आरोपाखाली दारू व्यवसायात गुंतलेल्या एका कंपनीच्या जागेवर विभागाने छापा टाकला. यामध्ये बुद्धिस्ट डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड, बलदेव साहू इन्फ्रा लिमिटेड, क्वालिटी बॉटलर्स आणि किशोर प्रसाद-विजय प्रसाद बेव्हरेज लिमिटेड या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. झारखंडमधील रांची आणि लोहरदगा व्यतिरिक्त ओडिशातील बालंगीर, संबलपूर, रायडीह भागात छापे टाकण्यात आले आहेत.
धीरज साहू यांचे कुटुंबीय काय करतात?
बुद्धिस्ट डिस्टिलरी ही राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कुटुंबाची कंपनी आहे. ही कंपनी मद्य व्यवसायात आहे आणि ओडिशामध्ये तिचे अनेक मद्यनिर्मिती कारखाने आहेत. या कारणास्तव करचुकवेगिरीच्या आरोपाखाली कंपनीच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. २००९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत धीरज साहू पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार बनले होते. त्यानंतर ते २०१० मध्ये दुसऱ्यांदा आणि २०१८ मध्ये तिसऱ्यांदा राज्यसभेवर पोहोचले.
आयकर नियम काय सांगतात?
धीरजच्या घरातून ज्या प्रकारे संपत्ती मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात करचुकवेगिरीचा तपास अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आयकर नियमांनुसार अघोषित उत्पन्न आढळल्यास करासह दंडाची तरतूद आहे. टॅक्स स्लॅबवर अवलंबून, ३०० टक्क्यांपर्यंत कर आणि दंड आकारला जाऊ शकतो. नियमानुसार धीरज साहू यांना मालमत्ता परत मिळणे अवघड आहे. अतिरिक् कर देखील भरावा लागेल. अघोषित मालमत्तेच्या बाबतीत, आयकर विभागाकडून जास्तीत जास्त ३३ टक्के कर आकारला जातो, ज्यावर ३ टक्के अधिभार आहे. यानंतर २०० टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. नियमांनुसार, जप्त केलेली मालमत्ता चालू वित्तात घेतली असेल, तर त्यावर एकूण ८४ टक्के कर आणि दंड वसूल केला जाईल. पण जर ही काळी कमाई मागील वर्षांची असेल तर त्यावर ९९% पर्यंत कर आणि दंड वसूल केला जाऊ शकतो.