बेदरकारपणे गाडी चालविल्यास वाहन विमा पडणार महाग?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 02:53 AM2019-09-10T02:53:29+5:302019-09-10T06:37:44+5:30
तुम्ही वाहन कसे चालविता यावरून ठरणार विम्याचा हप्ता
नवी दिल्ली : तुम्ही गाडी कशी चालवता, तसेच तुम्ही किती अपघात केले आहेत, यावरून तुमच्या वाहन विम्याचा हप्ता ठरणार असून, यासंबंधीचा निर्णय लवकरच अंमलात आणला जाऊ शकतो.
देशातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नवा कायदा नुकताच अंमलात आला आहे. त्यानुसार, वाहतुकीचे नियम मोडल्यास लागणाऱ्या दंडात अनेक पट वाढ करण्यात आली आहे. यापुढील टप्पा म्हणून वाहतूक नियमांच्या भंगाचा वाहन विम्याशी संबंध जोडण्याचा निर्णय घेतला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. वाहन विम्याचे हप्ते नियमभंगाशी जोडण्यासाठी आवश्यक अंमलबजावणी चौकट आणि पद्धती याबाबतच्या शिफारशी करण्यासाठी विमा नियामक ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ने (इरडा) नऊ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. समितीला दोन महिन्यांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. गृहमंत्रालयाच्या नेतृत्वाखालील, तसेच दिल्लीतील वाहतूक व्यवस्था पाहणाºया उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनंतर इरडाने ही समिती स्थापन केली आहे. यासंबंधीचा पथदर्शक प्रकल्प तत्काळ सुरू करण्यासाठी योजना सुचविण्याचे निर्देश इरडाच्या समितीला दिले.
बेदरकारपणे वाहने चालवून निष्पाप नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांना कसे वठणीवर आणायचे, यावर कित्येक वर्षांपासून विचारविनिमय सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, इरडा समितीच्या संदर्भ शर्तीनुसार, समितीला सर्व राज्यांच्या वाहतूक विषयीच्या नियमांचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. समिती वाहतूक नियमभंगासाठी स्थायी अंक व्यवस्था सुचविणार आहे. या अंकांनुसार विमा कंपन्या संबंधित व्यक्तीच्या वाहन विम्याचा हप्ता ठरवतील.
७० टक्के अपघातांना चालकच कारणीभूत
विचारमंथन सुरू असले तरी वाहन विमा आणि वाहतूकविषयक नियमभंग यांची सांगड घालण्यासाठी देशात पहिल्यांदाच पुढाकार घेण्यात येत आहे. काही पाश्चात्य देशांत याची आधीच यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. जगभरातील आकडेवारीवरून असे समोर आले आहे की, ७0 टक्के अपघाताला चालकांचे वागणेच कारणीभूत असते.