चीनला शह; भारत-आखात रेल्वेमार्ग, युराेपातील व्यापार हाेणार सुपरफास्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 05:54 AM2023-09-10T05:54:00+5:302023-09-10T05:55:59+5:30
चीनच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी पाऊल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखालील जी२० परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या पुढाकाराने एक ऐतिहासिक घाेषणा करण्यात आली. भारत-आखाती देश-युराेप या आर्थिक काॅरिडाेरची घाेषणा पंतप्रधान माेदींनी केली. या तीन भागांना जलमार्ग तसेच रेल्वेमार्गाने जाेडण्यात येईल. भारत या देशांशी आर्थिक काॅरिडाॅरच्या माध्यमातून जाेडला गेल्यामुळे या भागातील व्यापारातील अनेक अडचणी दूर हाेतील. विशेषत: चीनच्या वर्चस्वाला यातून शह मिळेल.
भारत, आखात आणि युराेप हे रेल्वेमार्गाद्वारे थेट जाेडल्याने व्यापार ४० टक्के गतिमान हाेईल. ही एक ऐतिहासिक भागीदारी असल्याचे पंतप्रधान माेदी म्हणाले. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांच्यासह सर्वच युराेपियन राष्ट्रप्रमुखांनी याचे स्वागत केले आणि ही याेजना यशस्वीरीत्या पूर्ण हाेईल, यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. चीनचे महत्त्वाचे दाेन प्रकल्प आहेत. ‘बेल्ट ॲंड राेड इनिशिएटीव्ह’ आणि ‘चीन-पाकिस्तान आर्थिक काॅरिडाेर’. या दाेन याेजनांना जी२० तून उत्तर देण्यात आले आहे.
हे देश सहभागी : भारत, युएई, साैदी अरब, युराेपियन महासंघ, इटली, जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका.
जैव इंधन आघाडी
nवाहनांमुळे हाेणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जैव इंधनाकडे जग वळत आहे. जैव इंधनाला प्राेत्साहन देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय जैव इंधन आघाडी’ स्थापन करण्याची घाेषणा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केली.
nजी-२० अध्यक्षतेची संधी साधून भारत जैव इंधन आघाडीला प्राेत्साहन देऊ इच्छिताे. त्यादृष्टीनेच ही घाेषणा पंतप्रधान माेदींनी केली.
रेल्वे प्रकल्पाची जी-२० मध्ये घोषणा होणार असल्याचे वृत्त 'लोकमत'ने शनिवार, ९ सप्टेंबर रोजी प्रकाशित केले होते, ते तंतोतंत खरे निघाले.