दिल्लीत जाणार, पण खाली-फुकट नाही; मोदींच्या वक्तव्यावर शिवराज सिंहांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 03:48 PM2024-04-26T15:48:47+5:302024-04-26T15:49:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैतुलच्या सभेत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना दिल्लीला घेऊन जात असल्याचे वक्तव्य केले ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैतुलच्या सभेत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना दिल्लीला घेऊन जात असल्याचे वक्तव्य केले होते. ते आता तिथे काम करतील असेही म्हणाले होते. यावर आता शिवराजसिंह चौहान यांची प्रतिक्रिया आली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेला विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री न केल्याने शिवराज नाराज होते. मुली, महिलांसाठीच्या योजनांमुळे ते कमालीचे लोकप्रिय होते. अशातच भाजपाला विधानसभेला घवघवीत यश मिळाले होते. यामुळे पुन्हा शिवराजच मुख्यमंत्री होणार हे निश्चित असताना भाजपाने धक्कादायक निर्णय घेत मोहन यादव यांना संधी दिली. यामुळे शिवराज यांनी अनेकदा उघड नाराजी व्यक्त केली होती.
आता शिवराज हे विदिशा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मोदींच्या सभेनंतर लगेचच शिवराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात मोदी आणि इथे यादव काम करतील आणि मामा दिल्लीला जाणार आहे. मी दिल्लीला जाईन आणि दिल्लीला खाली-फुकट जाणार नाही, दुबळा-पातळ जरूर आहे, परंतु काम करूनच सोडेन. चिंता करू नका, असे वक्तव्य शिवराज यांनी केले आहे.
निवडणूक मामा नाही लढत आहे असे म्हणत शिवराज यांनी उपस्थितांना कोण लढतेय असा सवाल केला. यावर कार्यकर्त्यांनी मोदी असे म्हणताच शिवराज नाही असे म्हणाले. ही निवडणूक मी नाही तर कार्यकर्ते लढत आहेत. तुम्हीच शिवराज आहात असे ते म्हणाले. यावर कार्यकर्त्यांनी तुम्ही दिल्लीतून पंचायत मंत्री आणि कृषी मंत्री अशी दोन पदे आणा अशी मागणी केली आहे.