दादा होणार भाजपावासी?
By admin | Published: January 22, 2015 12:15 PM2015-01-22T12:15:01+5:302015-01-22T12:17:49+5:30
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यासंबंधी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्याची चर्चा सुरू आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २२ - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यासंबंधी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्याची चर्चा सुरू आहे. भारताचा यशस्वी कर्णधार राहिलेल्या गांगुलीचे देशभरात विशेषत: पश्चिम बंगालमध्ये असंख्य चाहते असून त्याचा फायदा उठवण्यासाठी भाजपा 'दादा'ला पक्षात आणण्याच्या प्रयत्नात आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणा-या निवडणुकीत शानदार विजय मिळवून सत्तारूढ होण्यासाठी भाजपाने कंबर कसून तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कडवी टक्कर देण्यासाठी भाजपाने हालचाली सूरू केल्या असून अनेक महत्वाचे मोहरे पक्षात आणण्याची तयारी सुरू आहे. त्याच तयारीचा एक भाग म्हणून गांगुलीला पक्षात आणण्याबाबत बोलणी सुरू आहेत. भाजपाचे अनेक वरिष्ठ गेल्या अनेक दिवसांपासून गांगुलीच्या संपर्कात असून बोलणी यशस्वी ठरल्यास येत्या काही दिवसातच त्याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.
दरम्यान यापूर्वीही भाजपाने गांगुली पक्षात प्रवेशासंबंधी ऑफर दिली होती. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने गांगुलीला तिकीट देऊ केले होते, मात्र तेव्हा त्याने त्यास स्पष्ट नकार दिला होता.