'23 मे रोजी मोदींना फासावर लटकवणार'; काँग्रेस उमेदवाराची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 09:16 AM2019-04-21T09:16:49+5:302019-04-21T09:18:18+5:30
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये काही थांबण्याची चिन्हे नाहीत.
जशपुरनगर (छत्तीसगड) : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये काही थांबण्याची चिन्हे नाहीत. निवडणूक आयोगाने काही बड्या नेत्यांवर प्रचारबंदीची कारवाई केली तरीही अन्य नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये सुरुच आहेत. आता छत्तीसगढमधील काँग्रेसचे उमेदवारांनी पंतप्रधान मोदींना फासावर लटकवण्याचे वक्तव्य केले आहे. यावरून नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडमध्ये रायगड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार लालजीत राठिया यांनी हे वक्तव्य केले आहे. या जागेवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. राठिया यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन करतानाच नरेंद्र मोदी यांना 23 मेला फासावर लटकवणार असल्याचे म्हटले.
दोन दिवसांपूर्वी एका प्रचारसभेला संबोधित करताना राठिया यांनी कुनकुरी विधानसभेच्या नारायणपूरमध्ये हे वक्तव्य केले होते. जे आता व्हायरल होत आहे. यावर टीका होत असताना राठिया यांनी उलट माजी मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांना लायकीत राहण्याचा सल्ला दिला. तसेच डॉ. रमन सिंह छोटे माणूस असल्याचे म्हटले आहे.
डॉ. रमन सिंह शनिवारी जशपूर विधानसभेच्या चम्पा गावात प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी शंभर दिवसांतच काँग्रेसचे लोक बरळायला लागलेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची जी हालत आहे तीच राठियांचीही आहे, असा आरोप त्यांनी केला होता.