शाळा भरण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार: केंद्र सरकार; आरोग्यसुरक्षा महत्त्वाची
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 07:25 AM2021-06-19T07:25:26+5:302021-06-19T07:25:53+5:30
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे तिथे शारीरिक अंतर कमी होते.
- नितीन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता आता कमी होऊ लागली असली तरी शाळा पुन्हा सुरू होण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांनाच आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. कारण त्यासाठी अजून योग्य वेळ आलेली नाही, असे तज्ज्ञांचे मत असून त्यांच्याच सल्ल्याने सरकार शाळांसंदर्भात निर्णय घेईल.
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे
तिथे शारीरिक अंतर कमी होते. संशोधनातून जसजशी नवी माहिती उजेडात येईल व दुसऱ्या बाजूला शिक्षकांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढेल, त्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र कदाचित विचार करू शकते. अर्थात तो निर्णय त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. ते म्हणाले, काही देशांत कोरोना साथीमध्ये बंद केलेल्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र त्यानंतर अशी स्थिती उद्भवली की, या शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या.
शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जोपर्यंत साथीचे पूर्णपणे निर्मूलन होत नाही तोपर्यंत या विषयाबाबत कोणतीही जोखीम पत्करणे योग्य ठरणार नाही.
मुलांसाठी उपचारांची वेगळी व्यवस्था
n नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्या प्रौढ व्यक्ती व लहान मुलांची संख्या जवळजवळ सारखीच होती.
n भविष्यात आवश्यकता वाटली
तर कोरोनाबाधित लहान मुलांच्या उपचारांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येईल.
n लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्यास शासकीय व खासगी रुग्णालये ऑक्सिजनपासून ते व्हेंटिलेटरपर्यंत सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नीट पार पाडतील.
सर्व प्रकारची सावधगिरी
n कोरोना साथीबाबत केंद्र सरकारच्या प्रमुख सल्लागारांमध्ये डॉ. व्ही. के. पॉल यांचा समावेश आहे.
n त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गापासून लहान मुलांचे आता संरक्षण होऊ लागले आहे.
n मात्र, या विषाणूने जर दुसरे रूप धारण केले तर त्यामुळे लहान मुलांना
मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
n तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फारसा धोका नाही असे वाटत असले तरी केंद्र सरकार सर्व प्रकारची सावधगिरी बाळगत आहे.