परिवहन सेवेत सुधारणा घडवणार, सेवा नफ्यात आणण्यासाठी पावलं उचलणार - बोम्मई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 01:58 PM2022-12-29T13:58:46+5:302022-12-29T13:59:25+5:30
परिवहन सेवेत सुधारणाही केल्या जातील, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.
राज्य परिवहन महामंडळ नफ्यात चालावे यासाठी आवश्यक सर्व ती पावले राज्य सरकार उचलणार असून खाजगी प्रवासी वाहतूकदारांशी कडवी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने परिवहन सेवेत सुधारणाही केल्या जातील, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.
बेळगावच्या नव्या 30 कोटी रुपये खर्चाच्या मध्यवर्ती बस स्थानकाचे काल मंगळवारी सायंकाळी उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. केएसआरटीसी मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ज्येष्ठ सेवानिवृत्त आयएएस अधिकारी श्रीनिवास मूर्ती यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापण्यात आली आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन परिवहन सेवा सुधारण्यात येईल. त्या अनुषंगाने लवकरच बीएमटीसीसह केएसआरटीसीच्या विभिन्न महामंडळांमध्ये बदल झालेला दिसून येईल असेही मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.
वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळ (एनडब्ल्यूकेआरटीसी) आपला रौप्य महोत्सव साजरा करत असल्यामुळे या मंडळाला 500 नव्या बस गाड्या खरेदी करण्यासाठी आणि 500 नवे कर्मचारी भरती करून घेण्यासंदर्भात आगामी अर्थसंकल्पीय बैठकीत चर्चा केली जाईल. केएसआरटीसीने नागरिकांना चांगली सेवा पुरवली आहे. परंतु कोरोना महामारी काळात तिला फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. राज्य सरकारने गेल्या 2 वर्षात परिवहन महामंडळाला 2000 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. तसेच केएसआरटीसी विभिन्न महामंडळांना नव्या बसेस खरेदी करण्याची आणि कर्ज काढण्याची परवानगीही दिली आहे, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री बोम्मई यांनी असंख्य स्थळांना जोडल्या गेलेल्या बेळगाव बस स्थानकाचे महत्व विषद केले.