रेल्वेत खासगी कंपन्यांचा सहभाग वाढविणार

By admin | Published: July 5, 2014 05:11 AM2014-07-05T05:11:36+5:302014-07-05T05:11:36+5:30

रेल्वेच्या विकासात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अर्थसंकल्पाच्या तोंडावर दिले आहेत.

Will increase the participation of private companies in the Railways | रेल्वेत खासगी कंपन्यांचा सहभाग वाढविणार

रेल्वेत खासगी कंपन्यांचा सहभाग वाढविणार

Next

कटरा : रेल्वेच्या विकासात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अर्थसंकल्पाच्या तोंडावर दिले आहेत. जम्मूतील उधमपूर- कटरा रेल्वेमार्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वैष्णोदेवीचे तळ मानल्या जाणाऱ्या कटरापर्यंत रेल्वे पोहोचणार असल्यामुळे भाविकांची वैष्णोदेवी यात्रा आता सुलभ झाली आहे.
रेल्वेस्थानकांवर विमानतळापेक्षाही चांगल्या सुविधा असाव्या, असे आम्हाला वाटते. हे आमचे स्वप्न असून आर्थिकदृष्ट्याही ते प्रत्यक्षात उतरणे अवघड नाही. रेल्वे मंत्रालयातील माझ्या मित्रांसोबतही मी त्यावर विस्तृत चर्चा केली आहे. नजीकच्या भविष्यात हा बदल तुम्हाला दिसून येईल. खासगी कंपन्या गुंतवणुकीला तयार होतील, कारण हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या चांगला राहणार असून प्रत्येकाला त्याचा फायदा होईल. येत्या काही दिवसांत त्या दिशेने वाटचाल करण्याची आमची इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विकासाच्या माध्यमातून जम्मू- काश्मीरच्या जनतेचे हृदय जिंकायचे आहे, अशी भावनिक सादही त्यांनी घातली. पंतप्रधान बनल्यानंतर मोदींनी जम्मू- काश्मीरला दिलेली ही पहिलीच भेट होती.
लाखो भाविकांसाठी ‘श्री शक्ती एक्स्प्रेस’
वैष्णोदेवीच्या यात्रेकरूंना कटरापर्यंत घेऊन जाणाऱ्या रेल्वेचे नाव ‘श्री शक्ती एक्स्प्रेस’ असे ठेवण्याची सूचना मोदींनी केली आहे. महत्त्वाकांक्षी काश्मीर रेल्वे प्रकल्पाचा भाग म्हणून कटरा रेल्वेकडे पाहिले जाते. कटरा- बनीहाल खिंड हा या रेल्वे प्रकल्पाचा अखेरचा भाग २०१८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. उधमपूर- कटरा हा २५ कि.मी.चा मार्ग बराच काळ रखडल्यानंतर पूर्णत्वास गेला असून त्यावर १,१३२.७५ कोटी रुपये खर्च आला आहे. सात बोगदे आणि ३० पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या पुलांवरून जाणाऱ्या या रेल्वेतून काश्मीरमधील पर्वतराजीचे दर्शन घडते. उधमपूर- कटरा मार्गावर चक्रहवाल हे छोटे रेल्वेस्थानक आहे. ५३ कि.मी. जम्मू- उधमपूर रेल्वेमार्ग आधीच सुरू झाल्यामुळे जम्मूहून थेट कटऱ्याला रेल्वेने पोहोचणे आता शक्य होणार आहे. लाखो भाविकांची यात्रा त्यामुळे सुलभ होणार आहे. देशाला ही रेल्वे अर्पण करताना मोदींनी सर्व भाविकांचे अभिनंदन केले. वैष्णोदेवीची यात्रा करण्याची देशभरातील लाखो भाविकांची इच्छा पूर्ण व्हावी, असेही ते म्हणाले.
सौर ऊर्जा रेल्वेस्थानक
कटरा रेल्वेस्थानक अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून स्वउत्पादित सौर ऊर्जेद्वारे तेथील काम चालेल. अन्य रेल्वेस्थानकांसाठी ‘मॉडेल’ म्हणून कटराचे नाव समोर येईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.
कटरा रेल्वेस्थानकाची रचना पाहता रेल्वेमंडळाचे अध्यक्ष अरुनेंद्र कुमार यांनी छतांवर सौर ऊर्जा पॅनल लावण्याचा प्रस्ताव ठेवत लवकरच तो प्रत्यक्षात आणण्याचे वचन दिले आहे. सौर ऊर्जेच्या निर्मितीमुळे विजेच्या दृष्टीने हे रेल्वेस्थानक आत्मनिर्भर बनेल, असे मोदींनी म्हटले.

Web Title: Will increase the participation of private companies in the Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.