इन्स्टाग्रामसाठी येत्या काळात लागणार पैसे?; खास कंटेंट पाहण्यासाठी ८९ रुपयांचे सबस्क्रिप्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 08:23 AM2021-11-12T08:23:13+5:302021-11-12T08:23:27+5:30
प्रत्येक महिन्याला इन्स्टाग्रामवरील खास कंटेंट पाहण्यासाठी ८९ रुपयांचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागू शकते.
सोशल मीडियाशी जोडले जाण्याचे प्रमाण तरुणाईमध्ये प्रचंड आहे. त्यामुळे भारत सर्वाधिक सोशल मीडिया वापरणाऱ्या देशामध्ये टॉप ३ मध्ये कायम असतो; पण तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या इन्स्टाग्रामसाठी येत्या काळात कदाचित पैसै मोजावे लागू शकतात. दर महिन्याला पैसै भरून इन्स्टाग्रामची सेवा देणारे सबस्क्रिप्शन मॉडेलवर सध्या कंपनी काम करत असल्याची माहिती आहे.
दर महिन्याला किती रुपये?
प्रत्येक महिन्याला इन्स्टाग्रामवरील खास कंटेंट पाहण्यासाठी ८९ रुपयांचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागू शकते. सध्या या किमतीची जोरदार चर्चा सुरू आहे; पण जेव्हा हे मॉडेल प्रत्यक्षात येईल, तेव्हा याची किंमत कमी अथवा अधिक असण्याची शक्यता आहे.
सर्वांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल का?
कदाचित नाही. कारण असे केले तर इन्स्टाग्रामलाच मोठा फटका बसेल. ज्यांना आपल्या आवडत्या कंटेट क्रिएटर्सच्या पोस्ट पाहायच्या आहेत, खास व्हिडिओ पाहायचे आहेत, त्यांना हे सबस्क्रिप्शन घ्यावे लागू शकते. याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, त्याबाबत लवकरच काही घडू शकते.
याचा फायदा कोणाला?
इन्स्टाग्राम क्रिएटर्स आणि इन्फ्ल्युअर्सला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ज्यांना सर्वाधिक लोक फॉलो करतात त्यांना जास्त होऊ शकतो.