कर्नाटकच्या राजकीय नाट्यामध्ये नवा ट्विस्ट, जेडीएस देणार भाजपाला पाठिंबा?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 08:44 AM2019-07-27T08:44:32+5:302019-07-27T08:48:01+5:30
कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर आता कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्याप संपलेले नाही.
बंगळुरू - कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर आता कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्याप संपलेले नाही. आता कर्नाटकमधील राजकीय नाट्यात नवा ट्विस्ट आला असून, सत्तेतून बाहेर झालेल्या जेडीएसच्या आमदारांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्यात यावा, असी मागणी केली आहे.
जेडीएसच्या आमदारांनी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना सांगितले की, येडियुरप्पा यांच्या सरकारला सरकारमध्ये सहभागी होऊन किंवा बाहेरून पाठिंबा देऊन समर्थन देता येऊ शकेल. मात्र या आमदारांनी अंतिम निर्णय कुमारस्वामी यांच्यावर सोडला आहे. तसेच ते जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल असे सांगितले आहे.
जेडीएसच्या आमदारांची शुक्रवारी बैठक झाली होती. त्यावेळी आमदारांच्या एका गटाने आपण विरोधी पक्षात बसावे आणि भाजपाच्या चांगल्या धोरणांचे स्वागत करावे असे सुचवले. मात्र चर्चेअंती सर्व आमदारांनी भाजपाला पाठिंबा देणे आणि सरकार वाचवणेच योग्य ठरेल, असे मत आमदारांनी व्यक्त केले.
जेडीएसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत आम्ही पक्षासोबत एकजुटीने उभे राहण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत काही आमदारांनी सरकारला पाठिंबा द्यावा, असे मत मांडले. तर काही जणांनी विरोधी पक्षात बसावे, असे सुचवले, अशी माहिती जेडीएसचे नेते जी.टी. देवेगौडा यांनी दिली.
Janta Dal (Secular) leader GT Devegowda after JDLP meet, yesterday: We all decided to be intact with the party. Some JDS MLAs suggested HD Kumarswamy to give outer support to BJP govt and some other MLAs suggested to be in opposition and to strengthen the party. pic.twitter.com/OFgEUsPNq1
— ANI (@ANI) July 27, 2019
दरम्यान, भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांना शपथ दिली. येडियुरप्पा यांना सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आपण सहज बहुमत सिद्ध करू, असा दावा त्यांनी केला.
येडियुरप्पा यांनी १0५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे राज्यपालांना शुक्रवारी सकाळी सत्तास्थापनेचा दावा करताना सांगितले. मात्र ही संख्या बहुमतासाठी पुरेशी नाही. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी किती आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, हे स्पष्ट होईल. काही आमदारांनी याआधी विधानसभाध्यक्षांना राजीनामे दिले आहेत. त्यांच्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. तसेच तीन आमदारांना विधानसभाध्यक्ष रमेश कुमार यांनी गुरुवारीच अपात्र ठरविले आहे. त्यामुळे सोमवारी किती जण मतदान करतात व किती जणांना मतदानाचा अधिकार असेल, हे २ दिवसांत स्पष्ट होईल.