तेलंगणात केसीआर यांना धक्का बसणार, एका मतदारसंघात पराभूत हाेणार? तर दुसऱ्या ठिकाणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 07:22 AM2023-12-02T07:22:34+5:302023-12-02T07:25:00+5:30
Telangana Assembly Election: तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे गजवेल आणि कामारेड्डी या दाेन मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.
तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे गजवेल आणि कामारेड्डी या दाेन मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. बहुतांश एक्झिट पाेलमध्ये राज्यात बीआरएसचा पराभव हाेणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. अशावेळी स्वत: केसीआर यांच्या मतदारसंघातील चित्र काय असेल, याबाबत चर्चा सुरू आहे. राज्यात ‘केस स्टडीज’ नावाच्या संस्थेने एक्झिट पाेलची आकडेवारी जाहीर केली आहे.
- केसीआर यांना दाेन्ही ठिकाणी कडवी झुंझ मिळू शकते. कदाचित ते कामारेड्डी येथून पराभूत हाेतील, असा अंदाज आहे. येथे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हे त्यांच्याविराेधात रिंगणात उतरले आहेत.
- गजवेल येथे कमी फरकाने त्यांचा विजय हाेईल, असे ‘केस स्टडीज’ने म्हटले आहे.
- सिरसिला येथे केसीआर यांचे पुत्र के. टी. राव हे विजयी हाेतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तेलंगाणात ११९ जागांसाठी ३० नाेव्हेंबरला मतदान झाले. एकूण ७०.६० टक्के मतदान झाले आहे. मात्र, यावेळी मतदानात सुमारे ३ टक्के घट झाली आहे. गेल्यावेळी ७३.७४ टक्के मतदान झाले हाेते. राज्याची राजधानी हैदराबादने पुन्हा एकदा निराशा केली. हैदराबादसह काही प्रमुख शहरांमध्ये मतदान कमी झाले आहे. मतदारांनी पाठ फिरवल्यामुळे सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे.
राजधानीतच कमी मतदान
राजधानीत अवघे ४६.५ टक्के मतदान झाले. राज्याच्या तुलनेत ते २४ टक्के कमी आहे. या शहरात तेलुगू सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रचंड लाेकप्रिय कलाकार राहतात. त्यांनी स्वत: मतदान करुन लाेकांना मतदानाचे आवाहन केले हाेते. कमी मतदान झालेले पहिले पाच मतदारसंघ हैदराबाद शहरातील आहेत.
सर्वाधिक मतदान
मुनूगाेडे ९१.५%
पालाईर ९०.२%
आलेर ९०.१%
भाेंगीर ८९.९%
सर्वात कमी मतदान
याकुतपुरात ३९.६%
चारमीनार ४१.४%
ज्युबिली हिल्स ४५.२%
- ग्रामीण भागातील मतदारसंघात लाेकांनी भरभरून मतदान केले.
- शहरी भागात मात्र लाेकांनी घरातच बसून राहणे पसंत केले.