तेलंगणात केसीआर पॅटर्न पुन्हा दिसणार?, विकासाचे मॉडेल केले उभे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 05:22 AM2019-02-13T05:22:49+5:302019-02-13T05:23:38+5:30
भाजपा आणि काँग्रेसपासून दूर राहत के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात दुसऱ्यांदा निर्विवाद सत्ता मिळविली़ तेलंगणाने लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा केला आहे.
- धर्मराज हल्लाळे
भाजपा आणि काँग्रेसपासून दूर राहत के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात दुसऱ्यांदा निर्विवाद सत्ता मिळविली़ तेलंगणाने लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा केला आहे. ज्याच्या बळावर चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राष्ट्र समितीने बहुमत मिळवीत दुस-यांदा सत्ता हस्तगत केली. हाच पॅटर्न लोकसभेत दिसेल, असा अंदाज जाणकारांचा आहे. काँग्रेस, भाजपा वायएसआर, तेलगू देसम पार्टी या पक्षांना तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) मोठे आव्हान आहे.
अंतरिम अर्थसंकल्पात शेतकºयांना वार्षिक सहा हजारांची मदत घोषित करून पाठ थोपटून घेणाºया केंद्र सरकारच्या आधी तेलंगणाने निव्वळ घोषणा केली नाही तर प्रत्यक्षात शेतकºयांना वार्षिक दोन हप्त्यात आठ हजारांची मदत देऊ केली आहे़ ज्यामुळे टीआरएसचा प्रभाव कायम असून, त्यांची किमया लोकसभेतही दिसून येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे़
केसीआर यांनी महाआघाडीत सहभाग घेतला नाही़ परंतु, तिसरा मोर्चा स्थापण्यास त्यांनी स्टालिन, नवीन पटनायक, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली़ मायावती आणि अखिलेश यांच्या भेटीचाही त्यांचा इरादा होता़ परंतु, महाआघाडीमुळे अन्य तिसºया मोर्चाची शक्यता नाही़ टीआरएसचा राजकीय इतिहास पाहिला तर २००४ मध्ये त्यांनी काँग्रेस सोबत निवडणूक लढविली़ पाच जागा जिंकल्या़ परंतु, तेलंगणा राज्य निर्मितीवरून के़ चंद्रशेखर राव आघाडीतून बाहेर पडले़ तेलंगणा राज्यनिर्मिती हा त्यांचा मूळ उद्देश होता़ आंदोलक ते शासक असा त्यांचा प्रवास झाला़ तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांमध्ये २०१४ साली ६३ जागा के़ चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला होत्या़ त्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ८८ वर पोहोचल्या़
केंद्रात सत्तेत असलेल्या आणि मोदींचा करिश्मा देशभर दाखविणाºया भाजपाला तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत एका जागेवर समाधान मानावे लागले़ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणातील एकूण १७ खासदारांपैकी टीआरएसचे ११ खासदार निवडणून आले़ तिथेही भाजपाकडे १ आणि काँग्रेसकडे २ जागा आहेत़ भाजपाचे बंडारू दत्तात्रय हे एकमेव खासदार आहेत़ सद्यस्थितीत त्यांचीही जागा अडचणीत आहे़ टीआरएस खालोखाल राज्यामध्ये १७ पैकी ११ लोकसभा मतदार संघात काँग्रेस दुसºया स्थानावर आहे़ या पार्श्वभूमीवर टीआरएस विरूद्ध सर्व पक्ष अशी लढाई होईल़ ज्यामध्ये टीआरएसचे पारडे अधिक मजबूत असून, अनुक्रमे काँग्रेस आणि तेलगू देसम पार्टी काही ठिकाणी लढत देईल़ मात्र सत्ताधारी भाजपाची स्थिती तेलंगणात नगण्य आहे़
मोदी सरकारच्या आधी शेतकरी मित्र योजना
रयतू बंधू अर्थात शेतकरी मित्र ही योजना तेलंगणा राष्ट्र समितीने अमलात आणली़ वर्षात दोन वेळा प्रत्येकी ४ हजार प्रमाणे एकूण ८ हजार रूपये खते, बी-बियाणांसाठी प्रत्येक शेतकºयाला मिळणार आहेत़ देशात निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने शेतकºयांना दोन हजार रूपये देऊ केले़ या उलट तेलंगणाने मे २०१८ पासून ही योजना अमलात आणली़ त्याचबरोबर केंद्राने असंघटित क्षेत्रासाठी पेन्शन योजना आणली, पण भरीव तरतूद केली नाही़ तेलंगणा सरकारने मात्र गरीब तसेच एचआयव्ही बाधितांसाठी एक हजार रूपयांची आसरा पेन्शन योजना आणली़ महिलांसाठी प्रसूतीनंतर केसीआर कीट, घरकुल योजना, दलितांना ३ एकर जमीन, पेयजलासाठी मिशन भगीरथ, २४ तास शेतीला वीज अशा कितीतरी योजना अंमलात आणल्याने तेलंगणात भाजपाची जादू आणि हवा चालत नाही़