'थलैवा' रजनीकांतचं ठरलं; बाळासाहेब ठाकरेंच्या 'फॉर्म्युल्या'ने करणार राजकारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 04:36 PM2020-03-12T16:36:18+5:302020-03-12T16:44:04+5:30
राज्यातील एआयएडीएमके आणि डीएमके या राजकीय पक्षांकडे इशारा करताना रजनीकांत म्हणाले की, लोकांना आता बदल हवा आहे.
नवी दिल्ली - 'थलाइवा' म्हणून प्रसिद्ध असलेले सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर राजकारणातील आपल्या प्रवेशाची गुरुवारी घोषणा केली. त्याचवेळी पक्षाचे नेतृत्व आपण स्वत: करणार असलो तरी मुख्यमंत्री आपल्याला व्हायचे नसल्याचे रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे.
पक्षाचे नेतृत्व ज्या व्यक्तीच्या हाती राहिल, तो व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, असा नियम त्यांनी पक्षासाठी ठेवला आहे. चेन्नई येथे आयोजित पत्रकार परिषदेत रजनीकांत यांनी पक्षस्थापनेसंदर्भात घोषणा केली आहे. तरुण आणि उच्चशिक्षीत लोकांना पक्षात संधी देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी पक्षाशी जोडल्या जाणाऱ्या लोकांचा ट्रॅक रेकॉर्ड देखील तपासला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
रजनीकांत यांच्या पक्षात दोन विभाग राहणार असून एका विभागावर पक्ष संघटनेची तर दुसऱ्या विभागावर सरकार चालविण्याची जबाबदारी राहणार आहे. आमच्याकडे मर्यादित लोक आहेत. त्यामुळे त्यांचा उपयोग योग्य रितीने करण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले. तामिळनाडूच्या लोकांसाठी आम्ही एक योजना तयार केली आहे. ही योजना घेऊन आम्ही जनतेत जाणार असल्याचे रजनीकांत यांनी सांगितले.
दरम्यान राज्यातील एआयएडीएमके आणि डीएमके या राजकीय पक्षांकडे इशारा करताना रजनीकांत म्हणाले की, लोकांना आता बदल हवा आहे. 69 वर्षीय रजनीकांत यांचे नाव शिवाजीराव गायकवाड असून चित्रपटात येण्यापूर्वी ते एसटी बसचे कंडक्टर म्हणून काम करत होते.