धर्मांतर केलंस तरच लग्न करेन; हिंदू तरुणीची मुस्लिम प्रियकरासमोर अट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 12:38 PM2017-11-30T12:38:28+5:302017-11-30T12:42:02+5:30
पूजा जोशीने आपल्या घरी जाण्यास नकार दिला असून, मोहसिन खान धर्मांतर करेपर्यंत आपण वाट पाहू असं सांगितलं आहे. आपल्या चुलत भावांच्या घरी राहण्याचा निर्णय तिने घेतला आहे.
जोधपूर - जोपर्यंत धर्मांतर करत नाहीस, तोपर्यंत तुझ्याशी लग्न करणार नाही अशी अट 20 वर्षीय हिंदू तरुणीने आपल्या मुस्लिम प्रियकरासमोर ठेवली आहे. पूजा जोशी असं या तरुणीचं नाव असून, आपल्या मुस्लिम प्रियकर मोहसीन खानसोबत ती पळून गेली होती. मोहसीन खान एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. तरुणी पळून गेल्यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिकानेरमधून एका दांपत्याला ताब्यात घेतलं, आणि जोधपूरला आणलं. जोपर्यंत संपुर्ण शहरभर हिंदू तरुणी मुस्लिम तरुणासोबत पळून गेल्याची वार्ता शहरभर पसरली होती. दोघांना पोलीस ठाण्यात आणलं तेव्हा अनेक हिंदू संघटनांचे कार्यकर्ते तसंच नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
गर्दीतील लोकांनी पोलीस ठाण्याबाहेरच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप करत मोहसिन खानला मारहाणही करण्यात आली. 'पूजा जोशीचा जबाब नोंदवण्यासाठी तिला दंडाधिका-यांसमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी आपल्या जबाबात जर मोहसिनने हिंदू धर्म स्विकारला तर त्याचीशी लग्न करणार असल्याचं पूजा जोशीने सांगितलं आहे', अशी माहिती एसीपी पूजा यादव यांनी दिली आहे.
पूजा जोशीने आपल्या घरी जाण्यास नकार दिला असून, मोहसिन खान धर्मांतर करेपर्यंत आपण वाट पाहू असं सांगितलं आहे. आपल्या चुलत भावांच्या घरी राहण्याचा निर्णय तिने घेतला आहे. 'तरुणी अल्पवयीन नाहीये. त्यामुळे कुठे राहायचं हा निर्णय ती घेऊ शकते. संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तिला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल', असं एसीपी पूजा यादव बोलल्या आहेत.
कुटुंबियांनी पूजाला घरी येण्यासाठी विनवण्या केल्या. पण काही केल्या पूजाने आपण घरी येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तिने प्रसारमाध्यमांशी बोलण्यासही नकार दिला.
दुसरीकडे सध्या देशात केरळमधील लव्ह जिहाद प्रकरण चर्चेत आहे. अखिला अशोकन उर्फ हादियाने धर्मपरिवर्तन करत शफीन जहानशी निकाह केला होता. यानंतर हादियाच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेत लग्न रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेच हादियाचं जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं असून, शफीनचे इसिसशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. केरळ उच्च न्यायालयाने कलम 226 अंतर्गत विवाह रद्द केला होता आणि हादियाला वडिलांकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता. यानंतर शफीनने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाच्या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच वडील मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत, असे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना हादियाला तमिळनाडूत वैद्यकीय शिक्षणासाठी परत पाठविण्याच्या आदेश दिला. तिच्या वडिलांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, ‘आमच्या कुटुंबात कोणाही दहशतवाद्याला स्थान नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.