'कंगना रणौतच्या 'त्या' वक्तव्याला मोदी-योगी देशद्रोह मानणार का ?'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 07:48 PM2021-11-14T19:48:06+5:302021-11-14T19:51:08+5:30
'तेच वक्तव्य एखाद्या मुस्लिमाने केले असते, तर त्याला गोळ्या घातल्या असत्या.'
अलिगढ:उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे आरोप-प्रत्यारोपाचे सत्र अधिक तीव्र झाले आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल(AIMIM) प्रमुख असदुद्दीन औवेसी सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. अलीगढमधील 'शोषित वंचित समाज संमेलना'ला संबोधित करताना ओवेसी यांनी कंगना राणौतच्या 2014 नंतर स्वातंत्र्य मिळाल्याच्या कथित वक्तव्यावर निशाणा साधला.
असदुद्दीन औवेसी म्हणाले, 'मला पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला की 2014 मध्ये? कंगनाने बोललेले वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमाने केले असते तर त्याला गोळ्या घातल्या असत्या. कंगनाच्या वक्तव्याला आता मोदी-योगी देशद्रोह मानणार का?' यावेळी त्यांनी मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन करत, हिंदू मत भाजपचे झाले, त्यांच्यासाठी मुस्लिम मताला किंमत नाही, असं म्हणाले.
गृहमंत्री शहांवर साधला निशाणा
यावेळी गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधत औवेसी म्हणाले, 'अमित शाह मुस्लिमांचे नाव घेतल्याशिवाय झोपू शकत नाहीत. आझम खान आठवतात तर अमित शहांना कासगंजचा अल्ताफ का आठवत नाही? ते हिंदू असते तर योगी आदित्यनाथ लगेच पोहोचले असते. पोलिसांचे निलंबन झाले पण त्यांच्यावर खुनाचा खटला चालवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.