ईशान्य भारतात 'नेडा'चा प्रयोग यशस्वी होणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 08:35 AM2018-03-03T08:35:16+5:302018-03-03T08:42:12+5:30
हिंदीभाषक पट्ट्यासह महाराष्ट्र, गुजरात अशा राज्यांमध्ये भाजपाला सत्ता स्थापन करता आली आहे. तसेच दक्षिणेत स्वबळावर कर्नाटकातही भाजपाला एकदा संधी मिळाली आहे.
मुंबई - हिंदीभाषक पट्ट्यासह महाराष्ट्र, गुजरात अशा राज्यांमध्ये भाजपाला सत्ता स्थापन करता आली आहे. तसेच दक्षिणेत स्वबळावर कर्नाटकातही भाजपाला एकदा संधी मिळाली आहे. मात्र ईशान्य भारतामध्ये आजवर म्हणावे तसे यश कधीही मिळाले नव्हते. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ओडिशा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात भाजपाची पाळेमुळे रोवण्यासाठी प्रयत्न करू असे स्पष्ट वक्तव्य केले आहे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्नही दिसून येतात.
केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता आल्यानंतर नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सप्रमाणे नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स २४ मे २०१६ रोजी स्थापन करण्यात आली. या आघाडीमध्ये नागा पिपल्स फ्रंट, सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट, पीपल्स पार्टी ऑफ अरुणचल, आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स पार्टी या भाजपाचे सहकारी पक्ष आहेत. आसाममध्ये एकेकाळी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असणारे हेमंत बिस्वा शर्मा भाजपामध्ये आल्यानंतर त्यांच्यामदतीने भाजपा आसाममध्ये सत्तेत येण्यास यशस्वी झाला. त्यांच्याकडेच या आघाडीच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. आसामच्या निवडणुकीनंतर ईशान्य भारतामध्ये भाजपाच्या बाजूने जनमत तयार व्हावे यासाठी राम माधव आणि केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्ननथानम हे या प्रदेशात अक्षरशः तळ ठोकून राहिले. या सर्व प्रयत्नांना यश आले तर भाजपासाठी हा आनंदाचा सर्वात मोठा क्षक्ष असेल.
सध्या या आघाडीचे सिक्किममध्ये पवनकुमार चामलिंग, आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल, अरुणाचल प्रदेशात पेमा खांडू, मणिपूरमध्ये बिरेन सिंग, नागालँडमध्ये टी.आर. झेलियांग हे मुख्यमंत्री आहेत. अरुणाचल प्रदेशात २००३ साली गेगांग अपांग यांनी भाजपाचे अल्पकाळाचे सरकार स्थापन केले होते. आता नागालँडमध्ये पुन्हा भाजपा आणि नागा पिपल्स पार्टी सत्तेत येण्याची शक्यता आहे. तसेच एक्झीट पोलमध्ये मेघालय आणि त्रिपुरा येथे भाजपाची आघाडी सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्रिपुरामध्ये या एक्झिटपोलनुसार निकाल लागले तर मात्र डाव्यांसाठी तो मोठा धक्का असेल. माणिक सरकार यांचा पराभव करण्यासाठी भाजपाने अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत.