नितीश कुमार पुन्हा महाआघाडीत येणार? लालू प्रसाद यादव यांचं सूचक विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 02:27 PM2024-02-16T14:27:11+5:302024-02-16T14:27:36+5:30
Nitish Kumar News: बिहारमध्ये झालेल्या बहुमत चाचणीवेळी सभागृहात संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार हे पुन्हा पलटी मारतील, असा इशारा दिला होता. तर आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील पुनरागमाबाबत सूचक संकेत दिले आहेत.
सातत्याने राजकीय भूमिका बदलणाऱ्या नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी महाआघाडीची साथ सोडून एनडीएमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सत्तेतून बाहेर व्हाले लागले होते. तर भाजपाचा सत्तेत समावेश झाला होता. दरम्यान, बिहारमध्ये झालेल्या बहुमत चाचणीवेळी सभागृहात संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार हे पुन्हा पलटी मारतील, असा इशारा दिला होता. तर आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्या महाआघाडीतील पुनरागमाबाबत सूचक संकेत दिले आहेत. नितीश कुमार पुन्हा महाविकास आघाडीत आले तर विचार करू. आमचे दरवाजे नेहमी उघडे असतात, आता लालूप्रसाद यादव यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
दरम्यान, नितीश कुमार यांनी आता यापुढे आपण एनडीएमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. जेडीयूचा पुन्हा एकदा एनडीएमध्ये समावेश करून भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. तर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणाले होते की, मी आधीही त्यांच्यासोबत होतो. आम्ही वेगवेगळ्या मार्गावरून चाललो. मात्र आता आम्ही एकत्र आहोत, तसेच यापुढे एकत्र राहू. मी जिथे होतो, तिथेच परत आलो आहेत. आता पुन्हा कुठे जाण्याचा प्रश्नच उलटत नाही, असे नितीश कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, नितीश कुमार यांनी राजकीय भूमिका बदलण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. नव्वदच्या दशकात लालूप्रसाद यादव यांची साथ सोडल्यानंतर नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष हे भाजपासोबत आले. त्यानंतर २०१३ पर्यंत ते एनडीएसोबत होते. मात्र २०१३ मध्ये नरेंद्र मोदींना भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख बनवल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीए सोडली होती. पुढे काही वर्षे जेडीयू आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत महाआघाडीमध्ये राहिल्यानंतर नितीश कुमार हे २०१७ मध्ये पुन्हा एनडीएमध्ये आले. नितीस कुमार एनडीएत परत आल्यावर एनडीएने बिहारमध्ये २०१९ मध्ये लोकसभा आणि २०२० मध्ये बिहारची विधानसभा निवडणूक जिंकली होती. मात्र २०२२ मध्ये पुन्हा एकदा पलटी मारत नितीश कुमार भाजपाची साथ सोडून महाआघाडीमध्ये गेले होते. त्यानंतर दीड वर्षे महाआघाडीचं सरकार चालवल्यावर नितीश कुमार भूमिका बदलून पुन्हा एनडीएमध्ये आले आहेत.