पुन्हा भारतात येणार नाही
By admin | Published: November 5, 2015 02:48 AM2015-11-05T02:48:26+5:302015-11-05T02:48:26+5:30
पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे दुखावलेले ख्यातनाम पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांनी यापुढे भारतात पाऊल न टाकण्याचा निर्णय
नवी दिल्ली : पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे दुखावलेले ख्यातनाम पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांनी यापुढे भारतात पाऊल न टाकण्याचा निर्णय घेतला असून भारताला कायमचे अलविदा केले आहे. दिल्ली आणि लखनौमधील नियोजित कार्यक्रमही त्यांनी रद्द केले आहेत.
गेल्या मे महिन्यात मुंबई व पुण्यात गुलाम अली यांचा कार्यक्रम होणार होता. मात्र शिवसेनेने त्यांच्या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला होता. दोन्ही कार्यक्रम उधळून लावण्याच्या सेनेच्या इशाऱ्यानंतर आयोजकांनी ते रद्द केले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार गुलाम अली यांच्यासारख्या महान कलाकारास सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत, खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुलाम अलींना दिल्ली कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. गुलाम अलींनीही हे निमंत्रण स्वीकारले होते. या कार्यक्रमासाठी ८ नोव्हेंबर ही तारीखही निश्चित झाली होती. मात्र अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यापाठोपाठ गुलाम अलींनी प्रकृती कारणास्तव हा कार्यक्रम रद्द केल्याच्या बातम्याही आल्या. तथापि आता गुलाम अलींनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण फेटाळून लावले आहे. दरम्यान, गुलाम अलींच्या कार्यक्रमांच्या आयोजकांमध्ये सामील दिल्लीचे पर्यटनमंत्री कपिल मिश्रा यांनी कार्यक्रम रद्द होणे दुर्दैवी असल्याचे म्हटले.