लसीकरण न झाल्यास उड्डाणांवर जाणार नाही, वैमानिक संघटनेची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 01:47 AM2021-05-05T01:47:43+5:302021-05-05T01:48:27+5:30

एअर इंडियाच्या वैमानिक संघटनेची भूमिका

Will not go on flights without vaccination | लसीकरण न झाल्यास उड्डाणांवर जाणार नाही, वैमानिक संघटनेची भूमिका

लसीकरण न झाल्यास उड्डाणांवर जाणार नाही, वैमानिक संघटनेची भूमिका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विमान कंपनीने तातडीने कोविड प्रतिबंधक लसीकरण न केल्यास उड्डाणांसाठी जाण्यास एअर इंडियाच्या पायलटांनी नकार कळविला आहे. कोरोनामुळे या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यामध्ये अडचणी येत असल्याने पायलट आक्रमक बनले आहेत. 

पूर्वाश्रमीच्या इंडियन एअरलाईन्समधील पायलटांची संघटना असलेल्या इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशनने एअर इंडियाच्या व्यवस्थापनाला पायलटांची मागणी कळविली आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना  कोरोनाची बाधा झाली आहे. या कर्मचाऱ्यांना कोणत्याही आरोग्यविषयक सुविधा मिळत नाहीत, तसेच त्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण नसते. त्यातच विमान कंपनीने मोठ्या पगारावर पगार कपात केल्याने त्यांना या आजारपणासाठीचा खर्च करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आता विमान कंपनीने तातडीने कर्मचारी आणि कुटुंबीयांचे लसीकरण करून द्यावे, अन्यथा पायलट उड्डाणासाठी जाणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. 
विमान कंपनीचे अनेक कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय कोरोनाने बाधित असून, त्यांना उपचारासाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याचेही या संघटनेने स्पष्ट केले आहे. जर तातडीने लसीकरणाची सोय केली नाही तर आमचे सदस्य उड्डाणाला जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले.

१० कर्मचारी विलगीकरणात 
एअर इंडियाचे १० कर्मचारी सध्या रोममध्ये विलगीकरणामध्ये आहेत. यामध्ये दोन पायलट आणि आठ कर्मचारी आहेत. यापैकी दोघे जण कोरोनाबाधित असून मागील बुधवारपासून ते तेथे अडकलेले आहेत. जगातील विविध देशांमध्ये विलगीकरणाचे नियम वेगवेगळे असल्याने त्याचा फटकाही या कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे संघटनेचे मत आहे. जगामधील विविध देशामध्ये एअर इंडियाची विमाने जात असतात.

Web Title: Will not go on flights without vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.