सीएएला पाठिंबा देणाऱ्या 'त्या' मुख्यमंत्र्याचा भाजपाला दे धक्का; राज्यात एनआरसी लागू न करण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 07:09 PM2019-12-20T19:09:46+5:302019-12-20T19:21:44+5:30
एनआरसीवरुन भाजपाला जोरदार धक्का
पाटणा: सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबद्दल मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू होणार नसल्याचं मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपा सत्तेत असल्यानं नितीश कुमार यांचं विधान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
संयुक्त जनता दलानं सुधारित नागरिकत्वाला पाठिंबा दिल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांना धक्का बसला. या मुद्द्यावरुन पक्षातील मतभेददेखील समोर आले. संयुक्त जनता दलाच्या अनेक नेत्यांनी कुमार यांच्या भूमिकेबद्दल असहमती दर्शवली. त्यामुळेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबद्दल नितीश कुमार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं होतं. संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) राबवली जाईल, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या विधानाबद्दल आज नितीश कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कसला एनआरसी, असं म्हणत कुमार यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न केला. बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले.
सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात वातावरण तापलं असताना नितीश कुमार यांनी एनआरसीबद्दलची भूमिका स्पष्ट केली. काही दिवसांपूर्वीच या संदर्भात पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी नितीश यांची भेट घेतली होती. बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नाही, असा विश्वास किशोर यांनी या भेटीनंतर व्यक्त केला होता. सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पक्षानं घेतलेल्या भूमिकेवर किशोर अतिशय नाराज होते.