बँकबुडव्यांना सोडणार नाही : मोदींचा इशारा
By admin | Published: March 28, 2016 03:47 AM2016-03-28T03:47:40+5:302016-03-28T03:47:40+5:30
कोणत्याही बँकबुडव्याला सोडले जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील रंगापाडा येथील प्रचार सभेत दिला. मात्र त्याचवेळी बँकांना बुडवून फरार झालेल्या
रंगापाडा (आसाम) : कोणत्याही बँकबुडव्याला सोडले जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील रंगापाडा येथील प्रचार सभेत दिला. मात्र त्याचवेळी बँकांना बुडवून फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या यांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत काँग्रेसवर हल्लाबोल केला. जनतेचा पैसा हडपणाऱ्या धनाड्यांना काँग्रेसनेच मदत दिली; याउलट आमच्या सरकारने गजाआड होण्याच्या भीतीमुळे पळून जाऊ लागलेल्या लुटारूंभोवती पाश आळवले आहेत, असेही ते म्हणाले.
बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पसार झालेल्या मल्ल्या यांचे प्रकरण हाताळण्यात अपयश आल्याचे कारण देत विरोधकांनी चौफेर टीका चालविल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी येथील निवडणूक प्रचारसभेत काँग्रेसला लक्ष्य बनविले. काँग्रेसच्या सरकारांनी श्रीमंतासाठी बँका उघडल्या. त्यांचे खिसे भरले. आता या पक्षाला त्याची किंमत मोजावी लागेल. माझ्या बँकांचे कर्ज बुडविणाऱ्यांभोवती पाश आवळले आहेत. आता त्यांना कारागृहात जाण्याच्या भीतीपोटी घाम फुटू लागला असून ते पळून जात आहेत, मात्र कुणालाही सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.
पाच लाख शेततळी...
देशाच्या बहुतांश भागात पाण्याची पातळी खालावत असल्याबद्दल
चिंता व्यक्त करताना मोदींनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणी कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी पाच
लाख शेततळी बांधण्याचे काम
सुरू असल्याचे नमूद केले.
शेतकऱ्यांनी कमी खते आणि अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतकऱ्यांसाठी असलेल्या अॅपचा वापर फायदेशीर ठरेल, असे ते म्हणाले. पुढील वर्षी फिफा (१७ वर्षे वयोगटाखालील) जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १२५वी जयंती असून, त्यांच्याशी निगडित पाच स्थळांचा कशा प्रकारे विकास केला जात आहे, याची माहितीही त्यांनी दिली.