जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 03:04 PM2018-01-01T15:04:18+5:302018-01-01T15:24:27+5:30
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले.
श्रीनगर - पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता रविवारी आणखी एका रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले, तर आणखी तिघे जखमी झाले. नंतर सुरक्षा दलांनी कित्येक तास केलेल्या जबाबी कारवाईत हल्ला करणारे तीन अतिरेकी ठार झाले. तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह सापडल्यानंतरच पहाटेपासून सुरु करण्यात आलेलं सर्च ऑपरेशन अखेर थांबवण्यात आलं. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा भ्याड हल्ला असल्याचं म्हटलं आहे. 'आमच्या जवानांचा आम्हाला गर्व आहे, त्याचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही', असंही ते म्हणाले आहेत.
Cowardly attack by terrorists. We are proud of our brave jawans, their sacrifice won't go in vain. The entire nation stands with their families: Home Minister Rajnath Singh on #Pulwama terror attack pic.twitter.com/wbGiYsynyQ
— ANI (@ANI) January 1, 2018
गेल्या वर्षी उरी येथे झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी व्हावी, असा हा आत्मघाती हल्ला रविवारी पहाटे २च्या सुमारास झाला. ‘सीअरपीएफ’ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीपासून आसपासच्या झुडपांमध्ये लपून बसलेले शस्त्रसज्ज अतिरेकी या तळात घुसले. प्रवेशद्वारावर पहारा देणा-या सशस्त्र जवानाने त्यांना हटकले, परंतु रॉकेट लॉन्चर व मशिनगन घेऊन आलेल्या या अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकत आत प्रवेश मिळविला.
Jammu & Kashmir: Wreath laying ceremony of CRPF jawan Mohd. Tufail in Rajouri's Dodasan; he had lost his life in #Pulwama terror attack pic.twitter.com/C0lDykm25d
— ANI (@ANI) January 1, 2018
सूत्रांनुसार, तळावरील निवासी इमारतीमध्ये गाढ झोपेत असलेले जवान या गडबडीने जागे झाले व अनेक जण बाहेर आले. अंदाधुंद गोळीबार करत, आत शिरलेल्या अतिरेक्यांच्या गोळ््यांनी यापैकी एक जवान जागीच ठार झाला. जखमींपैकी आणखी ३ जवानांना इस्पितळात उपचार सुरू असताना वीरमरण आले, तर एक जवान इसिपतळात नेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने दगावला.
तळाच्या आवारात घुसलेले अतिरेकी नंतर गोळीबार करत प्रशासकीय इमारतीच्या आश्रयास गेले. तोपर्यंत सीआरपीएफच्या स्वत:च्या जवानांखेरीज जम्मू-काश्मीर पोलीस आणि विशेष पथकाची कुमक आली. अतिरेकी लपलेल्या इमारतीस वेढा घातला गेला. सायंकाळपर्यंत दोन्ही बाजूंनी अधून-मधून गोळीबार सुरू होता. दोन अतिरेक्यांना खिंडीत गाठून ठार करण्यात यश आले. घुसलेला तिसरा अतिरेकी न सापडल्याने, संध्याकाळपर्यंत तळाच्या संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू होती.