Delhi Violence: 'कोणालाही सोडणार नाही मग तो...', अमित शाहांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 08:48 PM2020-03-11T20:48:42+5:302020-03-11T20:52:12+5:30
Delhi Violence: अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी आतापर्यंत ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी लोकसभेत चर्चा झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच, दिल्ली दंगलीसाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल. मग, तो कोणत्याही समाजाचा असो किंवा पार्टीचा, सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असे अमित शाह यांनी सांगितले.
सीएएवरून ईशान्य दिल्लीत दंगली उसळली. काही तासांत दिल्लीत दंगल उसळली. इतक्या कमी वेळात कुठल्याही कटाशिवाय दंगल उसळू शकत नाही. दंगल घडवण्यासाठी ३०० हून अधिक लोक यूपीमधून आले होते. या दंगल प्रकरणी कटकारस्थान रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दिशेने तपास सुरू असून याप्रकरणी कारवाई करताना कुठल्याही निष्पापावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचे अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले.
#WATCH Home Minister Amit Shah replies to the discussion over #DelhiViolence, in Lok Sabha https://t.co/Mv6NV3uzXD
— ANI (@ANI) March 11, 2020
याचबरोबर, अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी आतापर्यंत ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १५३ शस्त्र जप्त केली गेली आहेत. तसंच शांतता प्रस्थापित करण्यासाठी २५ फेब्रुवारीपासून ६५० बैठका घेण्यात आल्या आहेत. दिल्ली दंगल प्रकरणी एकूण २, ६४७ जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यापैकी काहींना अटकही केली गेली. २७ फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत ७०० एफआयआर दाखल झाल्या आहेत, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.
याशिवाय, अमित शाह म्हणाले की, "मी दंगलीत झालेल्या नुकसानाची आकडेवारी सादर करू शकतो. पण त्यामध्ये हिंदू किंवा मुस्लिम असा भेदभाव करू शकत नाही. तुम्हीसुद्धा असे काही करू नका. दंगलीत किती मुस्लिमांचे नुकसान झाले, किती हिंदूंचे नुकसान झाले ही काही विचारण्याची पद्धत नाही. या दंगलीत ज्यांचे नुकसान झाले ते सर्व भारतीय आहेत. दिल्लीत झालेल्या या दंगलीत ५२ भारतीयांचा मृत्यू झाला. तर ५२६ भारतीय जखमी झाले. तसेच ३०० अधिक भारतीयांची घरे जाळली गेली."