आज होणार 'वन रँक वन पेन्शन'ची घोषणा?
By Admin | Published: September 5, 2015 10:09 AM2015-09-05T10:09:25+5:302015-09-05T10:14:50+5:30
बहुप्रतिक्षित 'वन रँक वन पेन्शन' (ओआरओपी) योजनेसंदर्भात आज केंद्र सरकारतर्फे घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - बहुप्रतिक्षित 'वन रँक वन पेन्शन' (ओआरओपी) योजनेसंदर्भात आज केंद्र सरकारतर्फे घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारतर्फे ही योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आज दुपारच्या सुमारास महत्वपूर्ण घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा माजी सैनिकांनी दिला आहे.
या योजनेसंदर्भात तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपाच्या तीन दिवसीय समन्वय समितीच्या बैठकीदरम्यान संघातर्फे सरकारला करण्यात आली होती. देशाच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणांची बाजी लावणा-या सैनिकांना आंदोलन करायला लावण योग्य नसून या वादावर तत्काळ तोडगा काढायला हवा, असेही संघातर्फे सांगण्यात आले होते.
एकाच हुद्यावर मात्र वेगवेगळ्या काळात निवृत्त होणा-या सैनिकांना एकच निवृत्ती वेतन दिलं जाव अशी मागणी लष्करी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी केली असून गेल्या ८२ दिवसांपासून ते जंतरमंतर येथे साखळी उपोषण करत आहेत. ही योजना लागू झाल्यासा निवृत्ती वेतनातील मोठी तफावत संपुष्टात येईल. मात्र सरकारने या मुद्यावर कोणताही निर्णय अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने सैनिकांचे उपोषण सुरूच असून विरोधकही सरकारवर टीका करत आहेत.