Petrol, Diesel Under GST: पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये येणार? मोदी सरकारने राज्यसभेत दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:41 PM2022-07-26T17:41:24+5:302022-07-26T17:42:07+5:30
Petrol, Diesel under GST: भाजपच्याच राज्यसभा खासदारांनी राज्यसभेत यावर प्रश्न विचारला होता. यावर अर्थ राज्य मंत्र्यांचे उत्तर आले आहे.
गहू, तांदूळ, दही, लस्सी आदी पदार्थांवर जीएसटी लागू करण्यावरून काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारवर टीकेची झोड उठलेली असताना आता पेट्रोल, डिझेलजीएसटीमध्ये आणणार की नाही या प्रश्नावर राज्यसभेत उत्तर देण्यात आले आहे.
भाजपाच्याच राज्यसभा खासदारांनी राज्यसभेत यावर प्रश्न विचारला होता. १८ जुलैपासून विविध वस्तूंवर जीएसटी लावण्यात आला आहे. तसेच अनेक वस्तूंवरील जीएसटी वाढविण्यात देखील आला आहे. यामुळे आधीच महागाई आवासून उभी असताना वस्तूंच्या किंमती आणखी वाढल्या आहेत.
त्यातच सरकारने धान्य, दही, लस्सी आदी पदार्थांवर जीएसटी आकारला होता. परंतू विरोध पाहून तो मागे घेण्यात आला आहे. याचे खापर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जीएसटी परिषदेवर फो़डले आहे. असे असले तरी गेल्या काही काळापासून पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणण्याची मागणी होत आहे. या अनुशंगाने अशोक वाजपेयी यांनी राज्यसभेत प्रश्न विचारला होता.
लखनऊमध्ये १७ सप्टेंबर, २०२१ मध्ये जीएसटी परिषदेची बैठक झाली होती. त्यात अनेक राज्यांचे अर्थमंत्री सहभागी झाले होते. या बैठकीत सर्वांच्या संमतीने धान्य, दही, लस्सी आदी वस्तूंवर जीएसटी लावण्याचा निर्णय झाला होता. यावेळी भाजपेतर सत्ता असलेल्या राज्यांचे मंत्री देखील उपस्थित होते, असे अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले.
याचबरोबर पेट्रोल, डिझेल देखील जीएसटीमध्ये आणण्यासाठी जीएसटी परिषदेमध्ये एक प्रस्ताव आला आहे. या प्रस्तावावर विचार सुरु आहे, असे चौधरी यांनी सांगितले. हा निर्णय देखील जीएसटी परिषदच घेणार असल्याचेही ते म्हणाले. वाजपेयी यांनी एक देश, एक किंमत या सिद्धांतानुसार पेट्रोलिअम उत्पादनांवर समान जीएसटी लागू करणार का, असा सवाल केला होता. यावर मंत्र्यांनी हे उत्तर दिले आहे.