27 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 08:42 PM2019-08-29T20:42:36+5:302019-08-29T20:43:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिल्यानत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिल्यानत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. 27 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसमोर मोदी भाषण देऊ शकतात. यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक मंचावरून मोदी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानला इशारा देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होतील. तसेच न्यूयॉर्कमध्ये अनेक देशांसोबत मोदी द्विपक्षीय चर्चा करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये भाषण दिले होते. आता दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये संबोधित करणार आहेत.
संयुक्त राष्ट्रांमध्ये 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यत महाचर्चा बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. यादरम्यान, 24 सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प हे आमसभेला संबोधित करण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्रांमध्ये नरेंद्र मोदी हे काश्मीर प्रश्नाचा उल्लेख शक्यतो टाळतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र जागतिक मंचावरून पाकिस्तानला ते कठोर संदेश देतील. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारत नेहमीच विविध विषयांवर नेहमीच प्रभावीपणे आपली भूमिका मांडत आला आहे. काही वर्षांपूर्वी देशाच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आमसभेसमोर केलेल्या संबोधनाचा दाखला आजही दिला जातो. सुषमा स्वराज यांनी 2016 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसमोर काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानला कठोर इशारा दिला होता. त्यांच्या या भाषणाची आजही देशात चर्चा होते.