PM नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाणार? SCO बैठकीसाठी शाहबाज शरीफ यांनी पाठवले निमंत्रण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 04:02 PM2024-08-25T16:02:27+5:302024-08-25T16:03:00+5:30
पाकिस्तानमध्ये 15-16 ऑक्टोबर रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे आयोजन करण्यात आले आहे.
Pakistan Invitation to Narenrdra Modi : पाकिस्तानमध्ये 15-16 ऑक्टोबर रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना निमंत्रण पाठवले आहे. दरम्यान, पीएम मोदी पाकिस्तानात जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे यजमानपद सर्व सदस्य देशांकडे दिले जाते. यंदा याची जबाबदारी पाकिस्तानवर आली आहे. 15-16 ऑक्टोबर रोजी इस्लामाबादमध्ये SCO बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पाकिस्तानचे वझीर-ए-आझम शाहबाज शरीफ यांनी पीएम मोदींना निमंत्रण दिले आहे. मात्र, पीएम मोदी इस्लामाबादला जाण्याची शक्यता कमी आहे.
विशेष म्हणजे, पीएम मोदी नेहमीच विविध देशात आयोजित SCO बैठकीला उपस्थित राहतात, परंतु कझाकिस्तानमध्ये झालेल्या बैठकीला ते उपस्थित राहिले नव्हते. पंतप्रधानांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे यंदाही पंतप्रधान मोदी पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमी आहे.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) म्हणजे काय?
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली आहे. सुरुवातीला त्यात फक्त चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तानचा समावेश होता. 2001 मध्ये शांघाय फाइव्हवरुन शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये बदलल्यानंतर उझबेकिस्तानचा या संघटनेत समावेश करण्यात आला. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये SCO चे सदस्य झाले आणि इराणने 2023 मध्ये सदस्यत्व घेतले. 2024 च्या शिखर परिषदेत बेलारुसच्या सहभागानंतर सदस्य देशांची संख्या 10 झाली आहे.