CAA: एकाही मुस्लिमाचं नागरिकत्व गेल्यास राजीनामा देईन; भाजपा आमदार आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 09:27 AM2020-01-14T09:27:46+5:302020-01-14T09:31:48+5:30
भाजपाच्या आमदाराचं मतदारसंघातील मुस्लिम समुदायाला आश्वासन
गोरखपूर: सुधारित नागरिकत्व कायद्यांतर्गत (सीएए) माझ्या मतदारसंघातील एकाही मुस्लिम व्यक्तीला देशातून बाहेर काढल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असा आक्रमक पवित्रा भाजपा नेते डॉ. राधा मोहन दास अग्रवाल यांनी घेतला आहे. अग्रवाल २००२ पासून उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. सीएएशी संबंधित अफवांचं निराकरण करण्यासाठी अग्रवाल यांनी त्यांच्या मतदारसंघातील मुस्लिमांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी त्यांनी सीएएबद्दलची भूमिका स्पष्ट केली.
मतदारसंघातल्या संपर्क कार्यक्रमादरम्यान अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'गोरखपूरमधील एकाही मुस्लिम व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेण्याचा प्रयत्न झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन, हा विश्वास देण्यासाठी मी मुस्लिम समुदायाच्या गाठीभेटी घेत आहे. सीएएमुळे मुस्लिमांचं नागरिकत्व रद्द करुन घेण्यात येईल अशी माहिती समुदायाच्या मनात आहे का, ते जाणून घेण्याचा प्रयत्न संपर्क कार्यक्रमादरम्यान करण्यात येत आहे,' अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.
सीएए संदर्भात मुस्लिम नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं अग्रवाल म्हणाले. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये अत्याचार सहन कराव्या लागल्यानं भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याची तरतूद सीएएमध्ये आहे. तीच बाब संपर्क कार्यक्रमातून नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी भाजपाकडून जनसभा घेतल्या जात आहेत.