प्लॅस्टिकविरोधात लोकचळवळ उभी करणार, मन की बातमधून मोदींचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 02:23 PM2019-08-25T14:23:50+5:302019-08-25T14:23:55+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. मन की बात दरम्यान, मोदींनी भगवान श्रीकृष्ण आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आठवण काढली. तसेच स्वच्छता अभियान, फिट इंडियासह अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. तसेच महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात प्लॅस्टिकविरोधात व्यापक लोकचळवळीची सुरुवात केली जाईल, असे संकेतही नरेंद्र मोदींनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''गेल्या काही दिवसांत देशवासीयांनी विविध सण साजरे केले. शनिवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. मैत्री कशी असावी हे सुदाम्याच्या घटनेवरून आपण जाणू शकतो. तसेच एवढे महान व्यक्तीत्व असूनही, रणांगणात श्रीकृष्णाने सारथ्याची भूमिका बजावली.''
यावेळी मोदींनी महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचाही उल्लेख केला. ''आज भारत देश एका मोठ्या उस्तवाच्या तयारीमध्ये गुंतला आहे. तो उत्सव म्हणजे महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती. गांधीजींनी शेतकऱ्यांची सेवा केली. चंपारणमध्ये ज्या मिल कामगारांसोबत अन्याय होत होता त्यांची सेवा केली. गांधीजींनी गरीब, निराधार आणि कमकुवत लोकांच्या सेवेला आपले परमकर्तव्य मानले.'' असे मोदी म्हणाले.
Everyone can find solutions to present-day problems from Lord Krishna's life: PM Modi
— ANI Digital (@ani_digital) August 25, 2019
Read @ANI Story| https://t.co/7GCCdJVr7Gpic.twitter.com/QaseubShjq
''या 2 ऑक्टोबर रोजी जेव्हा बापूजींचा 150 वी जयंती साजरी केली जाईल. तेव्हा आम्ही उघड्यावरील शौचमुक्त भारत त्यांना समर्पित करू. तसेच त्याच दिवशी प्लॅस्टिकविरोधातील एका व्यापक लोकचळवळीची पायाभरणी करू. आज देशात जागरुकतेअभावी कुपोषणामुळे गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही स्तरामधील कुटुंबे प्रभावित झाली आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात देशभरात पोषण अभियान राबवले जाईल.'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.