मोदींना अशी मिठाई पाठवू की त्यांचे दात तुटतील - ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 07:42 PM2019-04-26T19:42:03+5:302019-04-26T19:42:43+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
कोलकाता: लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मातीपासून मिठाई तयार करु आणि त्यामध्ये दगडांचा वापर करु. ही मिठाई नरेंद्र मोदींना पाठवू, यामुळे मिठाई खाताना त्यांचे दात तुटतील, असा टोला ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.
बालुरघाट आणि गंगारामपूर इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी 'नरेंद्र मोदी याआधी पश्चिम बंगालमध्ये कधी आले नाहीत, आणि आता त्यांना बंगालमधून मतं हवी आहेत. आम्ही त्यांना बंगालमधील रसगुल्ला देऊ. आम्ही मातीपासून मिठाई तयार करु आणि त्यात दगडांचा वापर करु. ज्याप्रमाणे लाडू तयार करताना त्यात काजू, बेदाणे वापरतात त्याऐवजी दगडांचा वापर करु. यामुळे त्यांचे दात तुटतील’, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला 2014 मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना मोठा रसगुल्ला म्हणजे भोपळा मिळेल अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली.
WB CM in Asansol: Modi didn't come to Bengal earlier and in elections he needs votes from Bengal. We will give him rasgulla from Bengal. We will make sweets from soil and put pebbles in it similarly like cashew nuts & raisins are used in laddu, that will break teeth. pic.twitter.com/5QsdNgQ9lh
— ANI (@ANI) April 26, 2019
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दरवर्षी स्वत: निवडलेले दोन कुर्ते व बंगाली मिठाई मला भेट म्हणून पाठवतात, असे एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले होते. अभिनेता अक्षय कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिल्यानंतर त्याची जोरदार चर्चा होत आहे.
मोदीजी, मिठाई पाठवली म्हणून मत देणार नाही, ममता यांची गुगली
अनेक सणांमध्ये मी लोकांना मिठाई आणि गिफ्ट पाठवत असते. मी लोकांना रसगुल्ला पाठवते, पूजा असते त्या काळात गिफ्ट पाठवते, चहा पाजते मात्र त्यांना एकही मत देणार नाही, असा टोला ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना दोन दिलवसांपूर्वी लगावला होता. कोलकत्ता येथील हुगली येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
विरोधातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध- पंतप्रधान मोदी
विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांशी माझे जिव्हाळ््याचे संंबंध आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दरवर्षी स्वत: निवडलेले दोन कुर्ते व बंगाली मिठाई मला भेट म्हणून पाठवतात, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सुखद धक्का दिला. तसेच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी माझा दोस्ताना आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांबरोबर मी वर्षातून एकदा किंवा दोनदा एकत्र भोजनही घेतो. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्रीही नव्हतो तेव्हा काही कामानिमित्त संसदेत गेलो होतो. त्यावेळी गुलाम नबी आझादांशी खूप गप्पा मारताना बघून पत्रकारांनी मला विचारले ‘संघाचे असूनही तुमची आझाद यांच्याशी मैत्री कशी काय?' यावर आझाद यांनी सर्व पक्षांतील नेत्यांचे परस्परांशी कौटुंबिक जिव्हाळ््याचे संबंध असतात ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, असे उत्तर दिले होते.