राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 01:41 PM2024-09-20T13:41:36+5:302024-09-20T13:42:10+5:30
Shivdeep Lande News: मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे त्यांच्या धडाकेबाज कारवायांसाठी बिहारसह देशभरात प्रसिद्ध आहे. दरम्यान, त्यांनी अचानक नोकरीचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तसेच ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे त्यांच्या धडाकेबाज कारवायांसाठी बिहारसह देशभरात प्रसिद्ध आहे. दरम्यान, त्यांनी अचानक नोकरीचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तसेच ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिवदीप लांडे यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देताना आपण कुठल्याची राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शिवदीप लांडे यांनी पोलीस खात्यामधील नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, या चर्चांनी शिवदीप लांडे यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचारसणीसोबत जोडून घेण्याचा आपला विचार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच आपलं नाव कुठलाही नेता आणि पक्षासोबत जोडू नये, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.
दरम्यान, याबाबत शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात की, कालपासून मला जे प्रेम आणि प्रतिक्रिया मिळत आहेत, त्याबाबत मी कधीही विचार केला नव्हता, त्यासाठी सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो. मी काल राजीनामा दिल्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी मी कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करणार का? याबाबतची शक्यता चाचपून पाहण्यास सुरुवात केली. तर मी या पोस्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, माझं कुठल्याही राजकीय पक्षासोबत बोलणं सुरू नाही आहे, तसेच मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचारधारेसोबतही जात नाही आहे. त्यामुळे कृपया माझं नाव कुणासोबच जोडू नका, असं आवाहन शिवदीप लांडे यांनी केलं.
शिवदीप लांडे यांनी बुधवारी अचानक पूर्णिया विभागाच्या आयजी पदासह नोकरीचा राजीनामा दिला होता. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी पूर्णिया आयजी पदाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर लगेचच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आलं आहे. तिरहुतसारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवल्याने ते नाराज होते अशी चर्चा होती. राजीनाम्याबाबत माहिती देताना शिवदीप लांडे म्हणाले होते की, ''गेली 18 वर्षे शासकीय पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षांत मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा जास्त मानले आहे. माझ्या सेवेत काही चूक झाली असेल तर माफ करावे. मी यापुढे बिहारमध्येच राहणार आहे. बिहारच माझी कर्मभूमी असेल,'' असे त्यांनी स्पष्ट केले होते.