कपिल शर्मा शोमध्ये सिद्धू दिसणार का?
By admin | Published: March 22, 2017 12:28 AM2017-03-22T00:28:54+5:302017-03-22T00:28:54+5:30
आपल्या मंत्रिमंडळातील सदस्य नवज्योतसिंह सिद्धू यापुढे टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शोमध्ये सेलिब्रिटी-परीक्षक म्हणून भाग घेऊ
चंदीगड : आपल्या मंत्रिमंडळातील सदस्य नवज्योतसिंह सिद्धू यापुढे टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शोमध्ये सेलिब्रिटी-परीक्षक म्हणून भाग घेऊ शकतात की नाही, याबाबत आपण कायदेशीर सल्ला घेणार आहोत, असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी मंगळवारी सांगितले.
नवज्योत सिद्धू ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सेलिब्रिटी जज आहेत. पंजाबचे मंत्री बनल्यानंतर यापुढे त्यांना ही भूमिका पार पाडता येईल का, याबाबत आपण महाधिवक्त्यांचा सल्ला मागविणार आहोत, असे सिंह ते म्हणाले. याबाबत राज्यघटना किंवा कायदा काय म्हणतो, हे मला माहीत नाही. मंत्रिपदी असलेली व्यक्ती टीव्ही शोसाठी काम करू शकते का, याबाबत मी सल्ला घेणार आहे. सिद्धूंचे टीव्हीवर काम करणे पूर्णपणे कायदेशीर सल्ल्यावर अवलंबून राहील. त्यानंतर, मी याबाबत त्यांना कळवेन, असे ते सिंह म्हणाले. उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असलेल्या सिद्धूंना किरकोळ विभाग देण्यात आला आहे. त्यांना पर्यटन आणि सांस्कृतिकमंत्री बनविण्यात आले आहे.
आपल्या टीव्ही शोचा मंत्रिपदाच्या जबाबदारीवर परिणाम होणार नाही, असे सिद्धू म्हणाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यासारखा माझा मद्य, वाळू किंवा वाहतुकीचा व्यवसाय नाही. टीव्ही शोच्या माध्यमातून माझा उदरनिर्वाह चालतो. मी सोमवारपासून गुरुवारपर्यंत चंदीगडमध्ये आणि शुक्रवारपासून रविवारपर्यंत अमृतसरमध्ये राहाणार आहे. मी रात्री काय करतो, याच्याशी कोणाला देणे-घेणे असू नये. मुंबईतील चित्रीकरणानंतर पहिल्या विमानाने मी पंजाबला परतेन. (वृत्तसंस्था)