नव्या संसद भवनात पंडित नेहरूंचा पुतळा लावणार का? समिती घेईल निर्णय, मात्र तिची नियुक्तीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 08:48 AM2021-12-02T08:48:45+5:302021-12-02T08:49:16+5:30
Pandit Jawaharlal Nehru: पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा वा पुतळा नव्या संसद भवनात लागणार का, आणखी कोणाचे पुतळे वा प्रतिमा तिथे लावणार, याचा निर्णय लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार असली तरी ती स्थापनच झालेली नाही.
- शरद गुप्ता
नवी दिल्ली : पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा वा पुतळा नव्या संसद भवनात लागणार का, आणखी कोणाचे पुतळे वा प्रतिमा तिथे लावणार, याचा निर्णय लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार असली तरी ती स्थापनच झालेली नाही.
पं. नेहरूंच्या जयंतीच्या संसद भवनातील कार्यक्रमाला लोकसभाध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष वा केंद्रीय मंत्री हजर नव्हते. दिल्लीत नसल्याने पं. नेहरू जयंती कार्यक्रमास हजर नव्हतो, असे बिर्ला म्हणाले. नव्या संसद भवनात ठराविक विचारांच्या नेत्यांचेच पुतळे वा प्रतिमा लावण्यात येतील, अशी चर्चा सुरू आहे. त्यावर पुतळे व प्रतिमांबाबत समितीच निर्णय घेईल. त्यात लोकसभेचे आठ व राज्यसभेचे चार सदस्य असतील, असेही त्यांनी सांगितले. नव्या संसद भवनाचे काम वेळेत पूर्ण होईल, असा दावाही त्यांनी केला.
संसद भवन वा सेंट्रल हॉलमध्ये जागाच नसल्याने आणखी नेत्यांचे पुतळे वा प्रतिमांचे काय करायचे, हे ठरवण्यासाठी समितीची नियुक्ती २००० साली झाली होती. त्यानंतर मीरा कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ४ ऑगस्ट २००९ रोजी समिती स्थापन झाली. त्यात लालकृष्ण अडवाणी, सुशीलकुमार शिंदे, अरुण जेटली, ऑस्कर फर्नांडिस, डॉ. करण सिंह, सीताराम येचुरी, आदी सदस्य होते. त्या समितीची एकच बैठक झाली.
वाजपेयींच्या प्रतिमेचा निर्णय
त्यानंतर १६ व्या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक १८ डिसेंबर २०१८ रोजी झाली. त्यात संसद भवनात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा लावण्याचा निर्णय झाला.