पंतप्रधानपदासाठी शिवसेना देणार भाजपाच्या 'या' नेत्याला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:31 PM2019-01-23T12:31:31+5:302019-01-23T12:34:22+5:30
लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा शिवसेनेचा अंदाज आहे.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींचं नाव पुढे आल्यास शिवसेना त्यांना पाठिंबा देईल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. एका इंग्रजी वृत्तपत्राला राऊत यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी भाजपासोबत युती करणार नसल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेच्या शब्दकोषात युती हा शब्द नाही, असं राऊत म्हणाले.
भाजपा केवळ स्वत:चा विचार करते. त्यामुळे आम्हीदेखील आता फक्त आमचा विचार करतो, असं म्हणत राऊत यांनी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत नेमकं काय होईल, याचं भाकीत राऊत यांनी वर्तवलं. येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही. पुढची लोकसभा त्रिशंकू असेल. अशा परिस्थितीत नितीन गडकरी पुढील सरकारचं नेतृत्त्व करू शकतात, असं राऊत यांनी म्हटलं. याआधीही संजय राऊत यांनी सामनामधील लेखात गडकरी पंतप्रधान होऊ शकतात, असं भाकीत वर्तवलं होतं. यानंतर गडकरींनी आपल्याला पंतप्रधान होण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं होतं.
शिवसेनेनं गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकदा नरेंद्र मोदींच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी राहुल यांनी केली. यावेळी शिवसेनेनंही संयुक्त संसदीय समितीमार्फत राफेल कराराची चौकशी करण्याची मागणी करत भाजपाची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला. रोजगार, काळा पैसा, काश्मीर प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरुन शिवसेनेनं कायम मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.