बिहार विधानसभा निवडणूक: तेज प्रताप यादवांविरोधात वेगळी राहणारी पत्नी लढेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 00:14 IST2020-09-10T00:14:31+5:302020-09-10T00:14:44+5:30
ऐश्वर्या राय निवडणुकीबाबतची योजना लवकरच प्रसारमाध्यमांना सांगणार

बिहार विधानसभा निवडणूक: तेज प्रताप यादवांविरोधात वेगळी राहणारी पत्नी लढेल?
पाटणा : बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येत असताना राजकीय घडामोडींनीही वेग घेतला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्याविरोधात त्यांच्यापासून वेगळी राहणारी पत्नी ऐश्वर्या राय निवडणुकीत उभे राहण्याची अपेक्षा आहे.
ऐश्वर्या राय यांचे वडील चंद्रिका राय यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, तेज प्रताप यादवविरोधात माझी मुलगी विधानसभा निवडणूक लढवू शकते. चंद्रिका राय हे राजदच्या तिकिटावर गेल्या विधानसभा निवडणुकीत जिंकले होते. राय म्हणाले, ‘‘निर्णय घेण्यास ऐश्वर्या स्वतंत्र असून, माझा तिला नेहमीच पाठिंबा असेल. ज्या कोणत्या मतदारसंघाची निवड ती करील तेथून तिला निवडणूक लढवण्यापासून मी अडवणार नाही.’’ याबाबत तिची योजना कोणती याची माहिती ती लवकरच प्रसारमाध्यमांना सांगणार आहे.
तेज प्रताप यादव व ऐश्वर्या राय यांचा २०१८ मध्ये विवाह झाला; परंतु पाचच महिन्यांनी तेज प्रताप यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. तेव्हापासून यादव व राय कुटुंबांच्या संबंधांत फारच कटुता निर्माण झाली. त्यातून चंद्रिका राय यांना राजद सोडून द्यावा लागला व ते मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दलात (संयुक्त) दाखल झाले.
महुआ मतदारसंघातून यादव यांची माघार?
तेज प्रताप यादव हे महुआ मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी आगामी निवडणुकीत मतदारसंघ बदलण्याचा निर्णय घेतल्याच्या अफवा आहेत. तेज प्रताप हे २०१५ मध्ये २८ हजार मतांनी जिंकले होते. महुआ मतदारसंघातून ऐश्वर्या राय त्यांच्याच विरोधात उभे राहण्याची शक्यता असल्यामुळे यादव यांची महुआत उभे राहण्याची इच्छा नाही.