राज्यातील मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उतरविणार? पक्षाचा चेहरामोहरा बदलण्यावर भाजपचा भर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 05:30 AM2023-12-15T05:30:44+5:302023-12-15T05:31:18+5:30
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढप्रमाणेच लोकसभा निवडणुकीनिमित्त राज्यातील काही मंत्री, वजनदार नेत्यांना दिल्लीच्या राजकारणात आणण्याची तयारी भाजप श्रेष्ठींनी चालविली आहे.
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढप्रमाणेच लोकसभा निवडणुकीनिमित्त राज्यातील काही मंत्री, वजनदार नेत्यांना दिल्लीच्या राजकारणात आणण्याची तयारी भाजप श्रेष्ठींनी चालविली आहे.
मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांनी ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या. आगामी निवडणुकीत भाजपने शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीत ४८ पैकी ४५ जागा जिंकण्यासाठी ‘मिशन-४५’चे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात वजनदार उमेदवार उतरविण्याबरोबरच पक्षाचा चेहरामोहरा बदलण्यावरही भाजप श्रेष्ठींनी भर देण्याचे ठरविले आहे.
उत्तर मुंबईसाठी सीतारामन, गोयल?
राज्यात भाजपचा सर्वांत सुरक्षित लोकसभा मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावांचे पर्याय असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पंकजांना बीडमधून उमेदवारी?
राज्यातील भाजपच्या मंत्र्यांपैकी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यातील चार ते पाच मंत्र्यांची नावे लोकसभा निवडणुकीसाठी श्रेष्ठींच्या रडारवर असल्याचे समजते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
तरुण व नव्या चेहऱ्यांना संधी
राज्यात तरुण व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील भाजपच्या वजनदार मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरविले जाण्याची शक्यता आहे.