यंदा महिला खासदारांचा टक्का वाढेल? प्रमुख राजकीय पक्षांतर्फे मातब्बर महिला उमेदवार रिंगणात
By किरण अग्रवाल | Published: May 29, 2024 01:07 PM2024-05-29T13:07:00+5:302024-05-29T13:07:59+5:30
लोकसभेत जाणाऱ्या महिलांचा टक्का वाढण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे
किरण अग्रवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, रांची (झारखंड): आदिवासीबहुल असलेल्या झारखंडमध्ये यंदा खासदारकीसाठी आमदार ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात रिंगणात आहेत, त्याचप्रमाणे प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांनाही उमेदवारीची संधी दिली आहे. त्यामुळे येथून लोकसभेत जाणाऱ्या महिलांचा टक्का वाढण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे. अन्नपूर्णा देवी, गीता कोडा व जोबा मांझी, यशस्विनी, अनुपमा सिंह, राजदच्या ममता भुईया, ‘’बसपा’’च्या सावित्रीदेवी आदी प्रमुख पक्षांच्या महिला उमेदवारांचे भाग्य मत यंत्रात बंद झाले आहे. उर्वरित ३ जागांसाठी आणखी एका चरणात जेथे मतदान होणे बाकी आहे, तेथे झामूमो नेते शिबू सोरेन यांच्या मोठ्या सुनबाई, भाजपा उमेदवार सीता सोरेन निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ठळक नोंदी...
- गेल्या वेळी झारखंडमधून सर्वाधिक २५ महिला निवडणूक रिंगणात होत्या, त्यातील भाजपाच्या अन्नपूर्णादेवी व काँग्रेसच्या गीता कोडा या जिंकल्या.
- यंदा भाजपाने तीन, काँग्रेसने दोन तर झामुमो व ‘’राजद’’ने प्रत्येकी एकेका महिलेस संधी दिली आहे. ‘’झापा’’नेही महिलांना रिंगणात उतरविले आहे.
- कोडा यांनी काँग्रेसमधून व सोरेन यांनी झामुमोमधून भाजपात, तर भुईया यांनी भाजपा सोडून ‘’राजद’’मध्ये येऊन उमेदवारी मिळविली आहे.
- सिंहभूममध्ये कोडा व मांझी या दोन प्रमुख पक्षीय महिला उमेदवारातच मुख्यत्वे लढत झाली आहे.
- खुंटी मतदारसंघात माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या अडचणीत ‘’झापा’’च्या अर्पणा हंस व भारत आदिवासी पार्टीच्या बबिता कश्यप या महिला प्रतिस्पर्ध्यांनी भर घातली आहे.
इतिहास घडणार?
१४ पैकी रांची, राजमहल, गिरीडीह, दुमका व गोड्डा या पाच मतदारसंघातून आजवर कोणीही महिला निवडून जाऊ शकलेली नाही. यंदा रांचीतून काँग्रेसच्या यशस्विनी सहाय, तर दुमकामधून भाजपाच्या सीता सोरेन या दोन मातब्बर उमेदवार रिंगणात असल्याने यातील कुणाला आपल्या मतदारसंघातील पहिल्या महिला खासदार होऊन इतिहास घडविण्याचा मान लाभतो हे बघणे औत्सुक्याचे ठरले आहे.
५ वेळा महिला खासदार...
- एकीकृत राज्य असताना पलामू व धनबाद या २ मतदारसंघातून आतापर्यंत ५ वेळा महिला खासदार निवडून गेल्या आहेत.
- पलामूमधून कमला कुमारी व धनबादमधून रिता वर्मा यांनी सर्वाधिक प्रत्येकी चार वेळा विजय मिळवून विक्रम नोंदविला आहे.
राज्य निर्मितीनंतर चारच महिला खासदार...
स्वतंत्र झारखंड राज्याच्या निर्मितीनंतर महिला उमेदवारांचे निवडणुकीतील प्रमाण वाढले असले तरी सुशीला केरकेट्टा, सुमन महतो, अन्नपूर्णा देवी व गीता कोडा या चारच महिला निवडून गेल्या.