"पंतप्रधान राजीनामा देतील का?; चौथी पास राजाकडून काय अपेक्षा करणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 05:52 AM2023-09-29T05:52:27+5:302023-09-29T05:52:45+5:30
निवासस्थान नूतनीकरण चौकशीवरून वाद
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुख्यमंत्र्याच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणाच्या चौकशीत काहीच आढळले नाही तर खोटी चौकशी केल्याच्या गुन्ह्याखातर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देतील काय? असे आव्हान काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले.
सीबीआय चौकशी सुरु झाल्यामुळे आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. सीबीआय चौकशीतून त्यांची भीतीच दिसते आहे. आपल्याविरुद्ध चौकशी ही नवी गोष्ट नाही. शाळा, बस, मद्य, रस्ते, पाणी, वीज घोटाळ्यांच्या आरोपांसह जगात सर्वात जास्त चौकशी आपली झाली असेल. कोणत्याच प्रकरणात काहीही मिळाले नाही, असेही केजरीवाल म्हणाले.
एका चौथी पास राजाकडून आणखी अपेक्षाही काय करता येईल ते २४ तास चौकशीचे गेम खेळत असतात किंवा भाषणे देत असतात. आपल्याविरुद्ध ३३ पेक्षा जास्त प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. गेल्या आठ वर्षांपासून त्यांची चौकशी सुरु आहे. आता आणखी एका नव्या चौकशीची त्यात पडली. पण आपण झुकणार नाही. त्यांनी या प्रकरणाचीही चौकशी करुन घ्यावी, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. हा भाजप सरकारचा आम आदमी पार्टीला भयभीत करुन तोडण्याचा प्रयत्न आहे, अशी आक्रमक भूमिका केजरीवाल यांनी घेतली.
सुटका मुश्कील : तिवारी
केजरीवालचे सरकार हे गुन्हेगारांनी चालविलेले सरकार आहे. सीबीआय या प्रकरणाच्या मूळाशी जाऊन सर्व सत्य बाहेर काढावे, अशी मागणी भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी केली. देशाच्या राजकीय इतिहासात जन्माला आल्यानंतर अल्पावधीत सर्वसामान्यांना खजिना लुटण्याचा पराक्रम ‘आप’ने केला आहे. या प्रकरणातून केजरीवाल यांची सुटका मुश्कील आहे.