१३ वेळा राजघराणे सत्तेत येण्याचा विक्रम यावेळी मोडणार? हिमाचलमध्ये राजघराणे नव्हे, वैयक्तिक संबंध महत्त्वाचे ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 02:57 PM2024-05-21T14:57:10+5:302024-05-21T14:57:39+5:30
२०१९ ची निवडणूक राजघराण्यातील एकाही सदस्याने लढवली नव्हती.
शिमला : यापूर्वीच्या राजघराण्यांनी हिमाचलच्या राजकारणात तीन दशके वर्चस्व गाजवले होते, परंतु आता निवडणुकीत मतदारांशी वैयक्तिक संबंध अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. येथे राजघराण्यातील एकच सदस्य २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवत आहे. काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह हे मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २०१९ ची निवडणूक राजघराण्यातील एकाही सदस्याने लढवली नव्हती.
४ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात देवभूमीमध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या ६ ४, जागांवर पोटनिवडणुकीसाठी एकाच वेळी मतदान आहे. लोकसभेच्या ४ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत, तर ६ विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत.
भाजप म्हणते...
• भाजप नेते, तीन वेळा खासदार आणि कुल्लू राजघराण्याचे राजा महेश्वर सिंह यांनी सांगितले की, ज्या नेत्यांनी लोकांची सेवा केली आहे त्यांचा सन्मान केला जातो. आता राजघराण्यांचा प्रभाव दिसत नाही. लोकांशी कसे वागता हे महत्त्वाचे आहे.
काँग्रेस म्हणते...
काँग्रेस नेत्या, चंबा राजघराण्यातील सदस्या आशा कुमारी म्हणाल्या की, वैयक्तिक समीकरणे महत्त्वाची ठरतात. विक्रमादित्य सिंह यांना सहावेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वीरभद्र सिंह यांचा मुलगा असल्याचा फायदा होत आहे. मात्र त्यांनी स्वतःची ओळख रामपूर राज्याचे राजा म्हणून बनविलेली नाही.
लोक म्हणतात...
निवडणुकीत राजघराण्यांचा प्रभाव कमी होत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. मंडी लोकसभा मतदारसंघाने १९५२ पासून झालेल्या दोन पोटनिवडणुकांसह १९ निवडणुकांमध्ये राजघराण्यातील सर्वाधिक १३ सदस्य निवडून आणण्याचा विक्रम केला आहे, असे मंडीच्या बल्ह भागातील स्थानिक रहिवासी प्रियांका यांनी सांगितले.
अभिनेत्री वरचढ ठरणार?
• रामपूरचे वंशज विक्रमादित्य सिंह हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंडीचे विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांचे पुत्र आहेत.
त्यांचा मुकाबला भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौतशी होत आहे. हिमाचलमधील १ जून रोजी मतदान आहे.