आप- काँग्रेसच्या मतांची बेरीज यावेळी भाजपला दणका देणार?मतांची विभागणी दिल्लीत आतापर्यंत ठरली निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 02:13 PM2024-05-22T14:13:55+5:302024-05-22T14:17:06+5:30
दिल्लीच्या राजकारणात सुंभ जळूनही पीळ न गेलेल्या काँग्रेसशी ‘आप’ने केलेली युती भाजपला शह देण्यात कितपत उपयुक्त ठरते हे या निवडणुकीत दिसणार आहे.
दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी यंदा भाजप, काँग्रेस आणि आप या देशातील तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणारी झुंज लक्षणीय ठरणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीत लोकसभेत भाजपचे, तर विधानसभेत ‘आप’ने वर्चस्व गाजविले आहे. दिल्लीच्या राजकारणात सुंभ जळूनही पीळ न गेलेल्या काँग्रेसशी ‘आप’ने केलेली युती भाजपला शह देण्यात कितपत उपयुक्त ठरते हे या निवडणुकीत दिसणार आहे.
‘आप’ आणि भाजपमध्ये वर्चस्वासाठी जोरदार संघर्ष
- दिल्लीत काँग्रेसची मक्तेदारी संपविल्यानंतर ‘आप’ आणि भाजपमध्ये वर्चस्वासाठी जोरदार संघर्ष सुरू आहे. २०१९च्या लोकसभेत भाजपने गेल्या दहा वर्षातील ५६.८९ टक्के मतांच्या उच्चांकासह सलग दुसऱ्यांदा सातही जागा जिंकल्या.
- त्यावेळी काँग्रेस (२२.५ टक्के) आणि ‘आप’ (१८.१ टक्के) यांच्या मतांच्या बेरजेपेक्षा १६.४९ टक्के मते जास्त मिळवून भाजपचे सर्व उमेदवार विजयी ठरले होते.
- २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ (३२.९० टक्के) आणि काँग्रेस (१५.१० टक्के) यांच्या मतांची विभागणी ४६.४० टक्के मतांसह सर्व सात जागा जिंकणाऱ्या भाजपच्या पथ्यावर पडली होती. विधानसभेच्या सलग दोन निवडणुकांमध्ये ५४ टक्के मतांसह ७० पैकी अनुक्रमे ६७ आणि ६२ जागा जिंकणाऱ्या ‘आप’ला अद्याप लोकसभा निवडणुकीत खाते उघडता आलेले नाही.
सातत्याने नाकारले; पण...
दिल्लीत भाजपची किमान ३० ते ३२ टक्के मते पक्की असतात. विधानसभेत १९९३ साली एकदाच सत्तेत आलेल्या भाजपला दिल्लीकरांनी १९९८ पासून सातत्याने नाकारले आहे. मात्र, २०१४ पासून लोकसभेच्या सर्व सातही जागांसाठी भाजप दिल्लीकरांची पहिली पसंत ठरला आहे. दुसरीकडे केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली यांनी २०१३ साली दिल्ली विधानसभेची काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आणि २०२२ साली दिल्ली महापालिकेत १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपलाही पराभवाचा दणका दिला.
नेतृत्वहीन काँग्रेसच्या मतांची बेरीज निर्णायक
दोन वर्षांपूर्वी, दिल्ली पालिकेच्या २५० जागांसाठीच्या निवडणुकीत आपने ४२.०५ टक्के मतांसह १३४ जागांवर विजय मिळवित सत्ता संपादन केली.
त्यावेळी भाजपने ३९.०९ टक्के मतांसह १०४ जागा तर काँग्रेसने ११.६८ टक्के मतांसह ९ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतील ‘आप’-काँग्रेसच्या मतांची बेरीज भाजपपेक्षा जास्त भरली आहे.
मतांचा हा टेंड्र कायम राहिला तर ‘आप’-काँग्रेस आघाडीला भाजपवर बाजी उलटविता येईल. पण त्यासाठी नेतृत्वहीन काँग्रेसच्या मतांची बेरीज निर्णायक ठरणार आहे.