केंद्रीय मंत्र्यांची हॅटट्रिक हाेणार की हुकणार? काँग्रेसच्या गडात भाजपला मिळाले होते यश
By विलास शिवणीकर | Updated: April 19, 2024 05:26 IST2024-04-19T05:25:48+5:302024-04-19T05:26:23+5:30
राजस्थानच्या जोधपूर मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा राहिलेला आहे.

केंद्रीय मंत्र्यांची हॅटट्रिक हाेणार की हुकणार? काँग्रेसच्या गडात भाजपला मिळाले होते यश
विलास शिवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्क
जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा राहिलेला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्वाधिक पाच वेळा येथून विजय मिळविलेला आहे. मात्र, गत दोन निवडणुकात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत येथून लोकसभेत गेले आहेत. यंदा विजयी होऊन शेखावत हॅट्ट्रिक करणार का याबाबत उत्सुकता आहे.
यंदा शेखावत यांच्याविराेधात काँग्रेसने करण सिंह उचियारड़ा यांना उमेदवारी दिली आहे. शेखावत हे मोदींची गॅरंटी आणि केंद्र सरकारच्या विकास कामांच्या आधारे निवडणूक लढत आहेत. तर, उचियारड़ा हे गेहलोत सरकारच्या काळात राज्यात झालेल्या विकास कामांचा पाढा वाचत आहेत. बसपाने या मतदारसंघातून मंजू मेघवाल यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- जाेधपूरमधील ही लढत राजपूत विरुद्ध राजपूत अशी झाली आहे.
- उचियारडा हे जोधपूरचेच रहिवासी आहेत. शेखावत यांचेही शिक्षण जोधपूरमध्येच झाले आहे. मात्र, काँग्रेसकडून आता स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
- राम मंदिराची उभारणी आणि इतर विकास कामांच्या जोरावर आपण विजयी होऊ असा विश्वास शेखावत यांना आहे.
२०१९ मध्ये काय घडले ?
गजेंद्र सिंह शेखावत भाजप (विजयी) ७,८८,८८८
वैभव गेहलोत काॅंग्रेस ५,१४,४४८