महुआ मोईत्रांची खासदारकी जाणार? एथिक्स कमिटीच्या अहवालावर आज बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 10:20 AM2023-11-09T10:20:31+5:302023-11-09T10:21:26+5:30
लोकसभेच्या एथिक्स कमिटीची आज बैठक होत आहे. सभापती विनोद सोनकर हे या बैठकीतील अहवालावर निर्णय घेतील.
तृणमूल काँग्रेसच्या खासदारा महुआ मोईत्रा यांच्या खासदारकीवर आज महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या पोर्टलवर दुबईतून लॉगिन, पैसे घेऊन अदानींवर प्रश्न विचारल्याचे आरोप आदी गोष्टींमुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे
लोकसभेच्या एथिक्स कमिटीची आज बैठक होत आहे. सभापती विनोद सोनकर हे या बैठकीतील अहवालावर निर्णय घेतील. परंतू, हा अहवाल पास करण्यासाठी समितीमध्ये मतदानही घेतले जाण्याची शक्यता आहे. यानंतर हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडे ठेवला जाणार आहे.
या अहवालामध्ये ५०० पाने आहेत. यामध्ये महुआ मोईत्रांवरलोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारसही करण्यात आल्याचे समजते आहे. तसेच पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपांवर चौकशी करण्याची देखील यात शिफारस असू शकते.
अहवालात काय काय?
टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात घेऊन समितीने त्यांचे वर्तन आक्षेपार्ह आणि अनैतिक असल्याचे म्हटले आहे. त्याआधारे ही समिती आपल्या अहवालात महुआचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करणार आहे. समितीने आपल्या अहवालाच्या मसुद्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाची वेळेवर, सखोल, कायदेशीर आणि संस्थात्मक चौकशी करण्याची शिफारस भारत सरकारला केली आहे. मोइत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांच्यातील पैशांच्या व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची शिफारसही केली आहे.