...तर नितीशकुमार एनडीएत सहभागी? विरोधी ऐक्याच्या मार्गात अनेक अडथळे कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 08:32 AM2023-06-07T08:32:20+5:302023-06-07T08:34:11+5:30
देशात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याच्या प्रयत्नांत सातत्याने अडथळे येत आहेत.
विभाष झा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : देशात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याच्या प्रयत्नांत सातत्याने अडथळे येत आहेत. विरोधकांना एकत्र करण्याचे काम हाती घेतलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा चेहरा सर्वांनाच मान्य नाही. त्यामुळेच पाटणा येथे १२ जून रोजी होणारी विरोधकांची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राजकीय तज्ज्ञांचे असे मत आहे की, काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधी यांच्याऐवजी नितीशकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार नाही. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत नितीशकुमार यांच्या नावावर सहमती होणे कठीण आहे. कारण काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून, तो कोणत्याही प्रादेशिक पक्षाचा चेहरा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही.
ज्या राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेत आहे अशा राज्यात काँग्रेस पक्ष विरोधी ऐक्याची बैठक घेऊ इच्छित आहे. हिमाचल प्रदेशात विरोधी ऐक्याची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे विदेश दौऱ्यावर आहेत. ते भारतात परतल्यानंतरच यासंदर्भात पुढील रणनीती ठरवली जाईल.
...तर नितीशकुमार एनडीएत सहभागी
राजकीय तज्ज्ञांचे असे मत आहे की, विरोधी पक्षात नितीशकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब न झाल्यास नितीशकुमार हे पुन्हा एनडीएत जाऊ शकतात.