विजयाचा तिरंगा फडकवीन किंवा तिरंग्यामध्ये लपेटून येईन - शहीद कॅप्टन बात्रा
By Admin | Published: July 26, 2016 01:44 PM2016-07-26T13:44:15+5:302016-07-26T13:44:15+5:30
विजयाचा तिरंगा फडकवून येईन किंवा त्यामध्ये लपेटून येईन हे शब्द होते शहीद कॅप्टन विक्रम बात्राचे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - विजयाचा तिरंगा फडकवून येईन किंवा त्यामध्ये लपेटून येईन हे शब्द होते शहीद कॅप्टन विक्रम बात्राचे. कारगिल युध्दावर निघण्यापूर्वी विक्रमचा मित्राबरोबर हा संवाद झाला होता. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर पाच आठवडयांनी कॅप्टन विक्रम बात्राला तोलोलिंग जवळील १७ हजार फूट उंचीवरील शिखर ५१४० ताब्यात घेण्याचे आदेश मिळाले.
पाकिस्तानी घुसखोर या शिखरावर बंकरमध्ये दबा धरुन बसले होते. शत्रूला चकवण्यासाठी कॅप्टन बत्राने दुर्मिळ बाजूने शिखरावर चढून जाण्याचा निर्णय घेतला. बत्रा आणि त्यांचे पाच सहकारी कडा चढून शिखराच्या जवळ पोहोचले असताना पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरु केला. त्या परिस्थितीतही विक्रम बात्राची टीम शिखरावर पोहोचली आणि शत्रूच्या ठिकाणावर ग्रेनेड हल्ला केला.
आणखी वाचा
विक्रम बात्रांनी एकटयाने तीन घुसखोरांना कंठस्नान घातले. या चकमकीत कॅप्टन बात्रा गंभीर जखमी झाले. २० जून १९९९ च्या पहाटे ३.३० वाजता कॅप्टन बात्रांच्या टीमने शिखर ५१४० ताब्यात घेतले. त्यांच्या टीमने एकूण आठ घुसखोरांना कंठस्नान घातले.
सात जुलै १९९९ रोजी कॅप्टन बात्रावर तातडीने शिखर ४८७५ ताब्यात घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ही अत्यंत कठिण लढाई होती. १६ हजार फूट उंचीवर पाकिस्तानी सैन्य नेम धरुन बसले होते. एका जखमी अधिका-याची सुटका करण्याची जबाबदारीही बत्रावर होती.
या दरम्यान बत्राने सोबत असलेल्या जवानाला तुला मुलेबाळे आहेत तू बाजूला हो असे म्हणत पाकिस्तानी घुसखोरांना अंगावर घेतले. यावेळी झालेल्या गोळीबारात कॅप्टन बत्रा शहीद झाले. 'जय माता दी' हे कॅप्टन बत्रांचे शेवटचे शब्द होते. कॅप्टन बत्रा यांनी डोंगराळ भागातील अत्यंत कठिण लढाई लढली. मरणोत्तर त्यांना परमवीर चक्र या सर्वोच्च पदकाने सन्मानित करण्यात आले. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी हा वीर जवान देशासाठी शहीद झाला.