व्हायरल सत्य: दोन हजार रुपयांची नोट बंद होणार? रिझर्व्ह बँक म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 02:52 PM2019-08-20T14:52:04+5:302019-08-20T14:59:39+5:30
नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत सुरुवातीपासून उलटसुलट चर्चा होत असते.
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत सुरुवातीपासून उलटसुलट चर्चा सुरू असते. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात येणार असल्याने अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्याचा दावा या मेसेजमधून करण्यात येत आहे. मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द झालेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या स्पष्टीकरणानंतरी हे खोटे मेसेज व्हायरल होत आहेत.
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर चलनात आलेली दोन हजार रुपयांची नोट सुरुवातीपासूनच अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. तसेच या नोटीबाबत अनेकदा अफवाही पसरत असतात. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द होण्याचा संबंध अनेकजण दोन हजार रुपयांची नोट आणि काश्मीरशी जोडत आहेत. काश्मीर प्रश्नामुळे दोन हजार रुपयांची नोट रद्द करण्यात येत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. तसेच मेसेजला आधार म्हणून एसआयटीने सरकारला केलेल्या काही शिफारशींचा उल्लेख असलेली चित्रफीत शेअर केली जात आहे.
बँक आणि पैशांशी संबंध असल्याने हा मेसेज मोठ्या प्रमाणावर शेअर झाला आहे. व्हॉट्सअॅपवरूनही हा मेजेस अनेकांकडे शेअर होत आहे. मात्र रिझर्व्ह बँकेने हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले आहे. तसेच अशा प्रकारचा कुठलाही मेसेज शेअर केल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे.