मल्ल्या, नीरव मोदीला भारतात आणणार? ईडी, सीबीआयची टीम जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:14 PM2024-01-17T12:14:22+5:302024-01-17T12:14:44+5:30
अंमलबजावणी संचालनालय (‘ईडी’), ‘सीबीआय’ आणि राष्ट्रीय तपास संस्था (‘एनआयए’) यांची टीम त्यांना आणण्यासाठी लंडनला जाणार असल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्ली : भारत सरकार लंडनमधून फरारी गुन्हेगारांना आणण्याच्या तयारीत आहे. यात बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि शस्त्र व्यापारी संजय भंडारी यांचा समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालय (‘ईडी’), ‘सीबीआय’ आणि राष्ट्रीय तपास संस्था (‘एनआयए’) यांची टीम त्यांना आणण्यासाठी लंडनला जाणार असल्याचे वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक आणि ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत ब्रिटिश अधिकारीही सहभागी होणार आहेत. यामध्ये या फरारी गुन्हेगारांनी लंडन आणि इतर देशांमध्ये
कोणत्या मालमत्तेत पैसे गुंतविले आणि त्यांनी कुठे व्यवहार केले, याची माहिती भारतीय अधिकारी गोळा करणार आहेत.
हस्तांतरण रोखण्याचे प्रयत्न सुरू
विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि संजय भंडारी यांना ब्रिटनमधून आणले जाणार आहे. या तिघांनीही लंडन कोर्टात स्वत:ला भारतात पाठविण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. ‘ईडी’ने तिघांची भारतातील मालमत्ता जप्त केली आहे.
विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या हजारो कोटी रुपयांच्या संपत्ती विकून पैसे वसूल करण्यात आले आहेत आणि ते बँकांनाही परत करण्यात आले आहेत.