व्हॉट्सअॅपवर निर्बंध येणार? 18 एप्रिलला होणार सुनावणी
By admin | Published: April 6, 2017 09:48 AM2017-04-06T09:48:06+5:302017-04-06T13:57:35+5:30
सुप्रीम कोर्टानं जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपच्या खासगीत्व धोरणाचा विषय बुधवारी घटनापीठाकडे सोपवला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 6 - सुप्रीम कोर्टानं जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपच्या खासगीत्व धोरणाचा विषय बुधवारी घटनापीठाकडे सोपवला आहे. घटनापीठ यावर 18 एप्रिलला सुनावणी करणार आहे. गोपनीयता आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा व्यापक मुद्दा या प्रकरणात जोडला गेला असल्याचं कोर्टानं यावेळी सांगितले. जेव्हा एखादं प्रकरण व्यापक दृष्टीकोनातून सार्वजनिक चिंतेचा विषय बनतं, तेव्हा तो विषय घटनात्मक मुद्दा म्हणून समोर येतो, असं सरन्यायाधीश जे.एस. केहर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठानं सांगितले.
दरम्यान, हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. शिवाय, सर्व पक्षकारांनी घटनापीठासमोर हजर होऊन सुनावणीसाठी समोर येणारे मुद्दे निश्चित केले पाहिजेत, असे सरन्यायाधीश जे.एस. केहर आणि न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या पीठानं बुधवारी झालेल्या सुनावणीत सांगितले
काय आहे नेमकी याचिका?
व्हॉट्सअॅपनं 2016मध्ये आपल्या प्रायव्हेट पॉलिसमध्ये (गोपनीयता धोरण) बदल केला होता. ज्यानुसार व्हॉट्सअॅप युसर्जची माहिती फेसबुकसोबत शेअर करायला सुरूवात केली. यात युजर्सचा फोन क्रमांकासहीत अन्य महत्त्वाची माहितीचा समावेश होता.
25 सप्टेंबर 2016पर्यंत व्हॉट्सअॅप युजर्सची माहिती फेसबुकवर शेअर करू शकत नाही, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले होते. याबाबतचे नवीन गोपनीयता धोरण 25 सप्टेंबर 2016पासून अमलात आले होते. 25 सप्टेंबर 2016च्या पूर्वी व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या लोकांची माहिती शेअर न करता ती लगेचच काढून टाकावी, असा आदेशही मागील वर्षांच्या सप्टेंबर महिन्यात न्यायालयाने दिला होता. मात्र, व्हॉट्सअॅपने हायकोर्टाचा आदेश मानायला नकार दिला होता.
दरम्यान, केंद्र सरकार आणि ट्राय यांनी व्हॉट्सअॅपसारखे अन्य सोशल मीडिया नेटवर्कींग माध्यमं कायदेशीर आराखड्यात आणण्यासाठी त्यांच्या व्यवहार्यतेची पडताळणी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. यावर, व्हॉट्सअॅप युजर्स आपले खाते बंद करतो, त्या वेळी त्याच्या संबंधित माहिती सर्व्हरवरून काढली जाते, असे व्हॉट्सअॅपने यापूर्वी न्यायालयाला सांगितले आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता 18 एप्रिलला सुनावणी होणार आहे.